अंबरनाथ: अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा स्वतःचा उमेदवार आहे. त्यामुळे पक्ष एकसंघपणे उमेदवाराच्या पाठीशी आहे. कोणत्याही इतर पक्षाच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नाही. हे सगळे खोटे वृत्त असल्याची माहिती वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. वंचितचे काही माजी पदाधिकारी ठाकरे गटाचा प्रचार करत असल्याचे वृत्त होते. मात्र त्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात निवडणूक रंगतदार झाली आहे. येथे शिवसेना (एकनाथ शिंदे ) पक्षाच्या बालाजी किणीकर यांच्यापुढे शिवसेना (उद्धव ठाकरे), वंचित बहुजन आघाडी यासह इतर अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. अंबरनाथची थेट लढत शिवसेना (एकनाथ शिंदे) विरुद्ध शिवसेना (उद्धव ठाकरे ) यांच्यात होणार आहे. मात्र तरीही इतर उमेदवारांमुळे चुरस निर्माण झाली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सुधीर बागुल यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर अंबरनाथ विधानसभेत वंचित बहुजन आघाडीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी येथे उमेदवार देऊ नका अशी मागणी केली होती. वंचित बहुजन आघाडीच्या मतांमुळे सत्ताधारी आमदाराला फायदा होणार असल्याची भीती माजी शहराध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी व्यक्त केली होती. तसे पत्र त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे दिले होते. मात्र शेवटच्या क्षणी पक्षाने सुधीर बागुल यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीनंतर काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. गोसावी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरणे पसंत केले. मात्र बहुतांश पदाधिकारी यांनी वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार सुरू केला. या काळात वंचित बहुजन आघाडीने पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्या प्रवीण गोसावी यांच्यासह काही जणांची पक्षातून हकालपट्टी केली असल्याची माहिती पक्षाचे नरेश गायकवाड यांनी दिली.
पक्षाचा उमेदवार असल्याने दुसऱ्या कोणत्या पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. हे सर्व वृत्त खोटे आहे. पक्ष एकसंघपणे प्रचारात आहे. हा पक्षाची बदनामी करण्याचा प्रकार असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत.