गर्दुल्ले, फेरीवाल्यांचा वावर रेल्वे प्रवाशांसाठी डोकेदुखी

अंबरनाथ ते वांगणी रेल्वे स्थानकादरम्यान उभारण्यात आलेले पादचारी पुलांची दूरावस्था झाली असून रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पुलांना विविध समस्यांचा फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे हे पूल सोयीचे ठरण्याऐवजी प्रवाशांनाच डोकेदुखीचे ठरू लागले आहेत.

गेल्या काही वर्षांत अंबरनाथ ते वांगणीदरम्यान झालेल्या मोठय़ा  नागरीकरणाचा भार रेल्वे स्थानके आणि आसपासच्या परिसरावरही दिसू लागला आहे. रेल्वे स्थानकांच्या परिसरात प्रवाशांच्या सेवेसाठी लाखो रुपये खर्चून रेल्वे प्रशासनाने एमएमआरडीए तसेच इतर संस्थांच्या पुढाकाराने पादचारी पुलांची निर्मिती केली आहे.  अंबरनाथ रेल्वे स्थानकावर रेल्वेचा एक आणि पालिकेने बांधलेला एक पादचारी पूल आहे. कल्याणच्या दिशेला असलेला रेल्वेच्या पुलावर प्रवासी कमी तर गर्दुले जास्त अशी परिस्थिती आहे.  सायंकाळी या ठिकाणी गर्दुल्लय़ांचा वावर असतो. कर्जतच्या दिशेला असलेल्या  पुलावर छप्परच नाही. त्यामुळे प्रवाशांना ऊ न, पावसाचा मारा सहन करतच प्रवास करावा लागतो. त्यात सर्वाधिक प्रवासी या पुलाचा वापर करत असल्याने येथे मोठय़ा प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. पुलावर भाजी आणि फळविक्रेते बसून पुलाची निम्मी जागा व्यापत असल्यामुळे गर्दीची कोंडी होते. आता  पावसामुळे या पुलाला जोडणाऱ्या पायऱ्यांवरील लाद्याही निखळल्या आहेत. त्यामुळे पाय घसरून प्रवाशांना दुखापत होण्याच्या घटनांमध्ये वाढदेखील झाली आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी मोठय़ा प्रमाणावरी वाढले असल्याने त्याचा रेल्वे स्थानकावर भार पडतो आहे. येथे फलाट क्रमांक एक आणि दोनवर सर्वाधिक प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. चिंचोळ्या पूल असल्यामुळे स्थानकाबाहेर पडण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात.  कल्याणच्या दिशेला असलेल्या पुलाकडे जाण्यासाठी फलाटावर अर्धे छप्पर टाकण्यात आले आहे. याठिकाणी स्वयंचलित जिना गरज नसलेल्या फलाट क्रमांक तीनवर उभारण्यात आला आहे.

वांगणी रेल्वे स्थानकासाठी २००३ साली मंजुरी मिळालेला पूल अचानकपणे रद्द करण्यात आला. त्याचे काही काम केल्याने कंत्राटदाराला २० लाखांचे बिल देण्यात आले. पुन्हा २०१३ला नव्याने पुलाला मंजुरी मिळाली.  मार्च २०१५ पर्यंत पुलाची उभारणी करण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्यासही एक वर्ष उलटले आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

वांगणीच्या पुलासाठी आतापर्यंत दीड कोटींचा खर्च

वांगणी पुलाच्या उभारणीसाठी रेल्वेने ४८ लाख रुपये मंजूर केले होते. त्यानंतर तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. त्यानंतर याच भागात एक लहान पूल उभारण्यात आला. त्यासाठी ३६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र तो पुरेसा नसल्याने पुन्हा पुलाच्या उभारणीसाठी ९६ लाखाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या पुलाचे बांधकाम अत्यंत मंदगतीने सुरू आहे. एकंदर पुलाच्या उभारणीसाठी आतापर्यंत दीड कोटी रुपयांची रक्कम खर्च झाली असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

Story img Loader