अंबरनाथः अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा पराभव करायचे असल्यास एकाच सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊया, असे सांगत अंबरनाथच्या वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी येथे उमेदवार न देण्याची मागणी केली आहे. आपल्याकडे सक्षम उमेदवार नसल्यास लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आम्ही पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांना विनंती केल्याचे पक्षाचे प्रविण गोसावी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> कल्याण रेल्वे स्थानकात सुट्ट्या पैशावरून महिला तिकीट लिपिकाला मारहाण

अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ गेली १५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर येथून तिनदा विजयी झाले आहेत. मतदारसंघात रिपाइं, वंचित बहुजन आघाडीचीही मोठी मते आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धनंजय सुर्वे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तिसरी सर्वाधिक मते मिळाली. त्यावेळी विजेते डॉ. बालाजी किणीकर यांना ६० हजार ८३ मते मिळाली होती. तर वंचितच्या उमेदवाराला १६ हजार २७४ मते होती. तर कॉंग्रेसच्या रोहित साळवे यांना ३० हजार ७८९ मते मिळाली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे मते विधानभा मतदारसंघात आहेत. मात्र मत विभाजनाचा फायदा विजयी उमेदवाराला झाल्याचे यापूर्वीच्या निकालावरून दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मत विभाजन टाळून विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना पराभूत करायचे असल्यास लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. तसेच वंचितचा कोणताही उमेदवार अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात देऊ नका, अशी मागणी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा >>> विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन मिळतो कसा? राज ठाकरे यांचा ठाणे पोलिसांना प्रश्न

वंचितचे माजी शहरअध्यक्ष प्रवीण गोसावी यांनी याबाबतची मागणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली आहे. त्यासाठी पत्रही दिल्याचे गोसावी यांनी सांगितले आहे. याबाबत प्रविण गोसावी यांना विचारले असता, आपण निवडून येऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या उमेदवारामुळे संविधानासोबत असलेल्या पक्षांचे उमेदवार पडले तर आपल्यावर आरोप होईल. तो डाग यंदा नकोय. वेळ पडल्यास मविआचा उमेदवाराच्या मागे उभे राहू, असेही गोसावी म्हणाले आहेत.