अंबरनाथः अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे अंबरनाथचे प्रमुख नेते अरविंद वाळेकर आणि त्यांचे बंधू तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांना ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र नेमक्या कोणत्या प्रकरणात ही चौकशी केली जाणार आहे याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अंबरनाथमध्ये चर्चांना उधान आले आहे.

अंबरनाथ शहर हे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे वर्चस्व असलेले शहर आहे. नगर परिषदेवर स्थानिक शिवसेनेतील वाळेकर कुटुंबियांचे वर्चस्व आहे. माजी शहरप्रमुख अरविंद वाळेकर, मनिषा अरविंद वाळेकर या दोघांनीही नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. तर अरविंद वाळेकर यांचे बंधू राजेंद्र वाळेकर हे उपनगराध्यक्ष राहिले आहेत. गेल्या काही वर्षात शहरात माजी नगराध्यक्ष अरविंद वाळेकर आणि अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यात संघर्ष सुरू आहे. अनेकदा एकमेकांवर टीका करत एकमेकांवर हल्लाबोल करत असल्याचे चित्र शहराने पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणली. त्यानंतर आमदार बालाजी किणीकर यांनी वाळेकर यांचे वर्चस्व असलेल्या शहर शाखेत जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत जुन्या गोष्टींवर दिलगीरी व्यक्त केली होती. मात्र दोन्ही गटात झालेली समेट प्रत्यक्ष प्रचारात दिसली नाही. त्यातच किणीकर यांनी वाळेकर यांच्या कुटुंबातील एका सदस्याला जवळ केले. त्यामुळे वाळेकर कुटुंबीय दुखावल्याची चर्चा होती.

हेही वाचा >>>ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “

 त्यानंतर अचानक एका तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने अरविंद वाळेकर आणि राजेंद्र वाळेकर या दोघांनाही चौकशीसाठी पाचारण केल्याने आश्चर्य व्यक्त होते आहे. ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने दोन्ही वाळेकर बंधूंना समजपत्र दिले असून त्यात त्यांना २५ डिसेंबर रोजी ठाणे पश्चिमेतील गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीकामी हजर राहण्याचे कळवले आहे. नेमक्या कोणत्या प्रकरणात किंवा कुणाच्या तक्रार अर्जानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे हे मात्र पोलिसांनी सांगितले नाही. मात्र अशी समजपत्र देण्यात आल्याच्या वृत्ताला गु्हे शाखेच्या पोलिसांनी दुजोरा दिला आहे. मात्र वाळेकर कुटुंबियांच्या घरातील विवाह कार्यक्रमानिमित्त वाळेकर कुटुंबीय बाहेर असल्याचे कळते आहे. या समजपत्रामुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Story img Loader