अंबरनाथ : पडघा येथील विद्युत केंद्रातून निघणाऱ्या वाहिनीवर झालेल्या बिघाडामुळे अंबरनाथकरांची रविवारची रात्र अंधारात गेली. संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मध्यरात्रीच्या तीन वाजेपर्यंतची वाट पहावी लागली. स्थानिक महावितरण अधिकाऱ्यांनी चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा केल्याने काही अंशी दिलासा मिळाला. मात्र सकाळी अनेक भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. या काळात पथदिवे बंद असल्याने अंधारात भर पडली.
पडघा येथील विद्युत केंद्रातून येणाऱ्या वाहिन्यांवर बिघाड झाल्याने रविवारी अंबरनाथ आणि आसपासच्या भागातील वीज ग्राहकांना मोठा फटका बसला. रात्री आठच्या सुमारास बंद झालेला वीज पुरवठा सुरू होण्यासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागला. रात्री दहाच्या सुमारास एका फिडर वरून सुरू असलेला वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने करण्यात आला. त्यामुळे काही भागात काही तास नागरिकांना दिलासा मिळाला. रात्री बाराच्या सुमारास अंबरनाथ पश्चिम भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला. तर काही वेळेत अंबरनाथ पूर्वेतील वीज पुरवठा सुरळीत झाला. संपूर्ण वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी मध्यरात्रीचे तीन वाजले अशी माहिती काही नागरिकांनी दिली. या काळात कांबा गावाजवळ उच्चदाब विद्युत वाहिन्यांवर दुरुस्तीचे काम सुरू होते. या काळात अंबरनाथ शहर अंधारमय झाले होते.
धक्कादायक म्हणजे त्यापुर्वी शहरातील कल्याण बदलापूर राज्य मार्गावरील संपूर्ण पथदिवे अंधारात होते. वीज बंद असल्याने सायंकाळीच रस्ता अंधारात गेला होता. थेट अंबरनाथ शहराच्या उल्हासनगर प्रवेशद्वारापासून ते थेट बदलापूर शहरापर्यंत पथदिवे बंद होते. त्यामुळे संपूर्ण शहर अंधारात वाटत होते. गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथ शहरात पथदिवे देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपनीविरुद्ध तक्रारी वाढल्या आहेत. पथदिवे बंद असताना सुद्धा त्याची वेळेत दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. त्यात रविवारी मुख्य वीज पुरवठा आणि पथदिवे दोन्ही बंद असल्याने शहर अंधारमय झाले होते.
अंबरनाथ शहराला होणारा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद असल्याने सकाळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला. रात्री झालेले झोपेचे खोबरे आणि सकाळी नसलेले पाणी यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण होते.