कल्याण – आंबिवलीमधील इराणी वस्तीमधील एका सराईत संशयित गुन्हेगाराला अंधेरीतील एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री इराणी वस्तीत पकडले. त्याला आंबिवली रेल्वे स्थानकात पोलीस पथकाकडून नेले जात असताना इराणी वस्तीमधील जमावाने पोलीस पथकाचा पाठलाग करून त्यांना रेल्वे स्थानकात रोखून, त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस अधिकारी, दोन पोलीस जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलिसांनी पकडलेला गुन्हेगार पोलीस पथकाच्या तावडीतून पळाला.
खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील हवालदार यशवंत पालवे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी इराणी वस्तीमधील कुर, तौफिक, फातिमा, गाझी जाॅन, शहजादी, गुलाम, मोसम, जाफर, नुरी, सेरा आणि इतर २० अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी पकडलेला संशयित गुन्हेगार ओनु लाला इराणी (२०) हे जमावाने केलेल्या दगडफेक आणि ओनुच्या नातेवाईकांनी त्याची पोलीस पथकाच्या तावडीतून सुटका केल्याने पळून गेला.
मुरबाडमध्ये माजी उपसरपंचाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले, अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दाखल एका गुन्ह्यातील इसमाला पकडण्यासाठी एमआयडीसी पोलिसांचे पथक बुधवारी रात्री आंबिवलीतील इराणी वस्तीत आले होते. पथकाने संबंधित इसमाला ताब्यात घेतल्यानंतर ते आंबिवली रेल्वे स्थानकाकडे येत असताना इराणी वस्तीमधील जमावाने त्यांंचा पाठलाग केला. बचावासाठी पथकाने गुन्हेगारासह रेल्वे स्थानकातील एका दालनाचा आधार घेतला. परंतु, जमावाने पोलीस पथकाच्या दिशेने दगडफेक करून त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखले. या प्रकरणात एक पोलीस अधिकारी, दोन पोलीस जखमी झाले आहेत.
खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, संशयित गुन्हेगार ओनु इराणी यांना पोलीस पथकाने पकडून चालविले होते. पोलीस पथकाच्या तावडीतून ओनु यांची सुटका करण्यासाठी इराणी वस्तीमधील जमावाने पथकाच्या दिशेने दगडफेक करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. पोलिसांना गंभीर दुखापती करून त्यांंना त्यांच्या कर्तव्यापासून रोखले. तसेच दगडफेकीत रेल्वेचे तिकीट घर, इतर मालमत्तेचे नुकसान केले म्हणून वीस जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
इराणी वस्तीमधील गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलीस आले की त्यांच्यावर हल्ला करण्याचे प्रकार मागील अनेक वर्षांपासून या वस्तीत सुरू आहेत. गेल्या वर्षीही असाच हल्ला मुंबईतून आलेल्या पोलिसांवर करण्यात आला होता. गुन्ह्यातील हे आरोपी जामिनावर बाहेर आले की पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात.
हेही वाचा – ठाकुर्लीत उड्डाण पूल बाधित रहिवाशांचे विकासकाकडून पुनर्वसन
आंबिवलीत एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी रात्री आले होते. गुन्हेगाराला पकडून नेत असताना आंबिवली वस्तीमधील जमावाने दगडफेक करून तीन पोलीस कर्मचारी जखमी केले. खडकपाडा पोलिसांनी रात्रीतून या भागात धरपकड सत्र राबवून पाच जणांना अटक केली आहे. जमावातील इतरांनाही अटक करण्याची मोहीम सुरू आहे. – अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त, कल्याण.