कल्याण : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. दिवाळीपूर्वीचे दोन हप्ते आचारसंहितेची अडचण नको म्हणून बँकांमध्ये जमा केले. त्यामुळे आमची देना बँक आहे. लेना बँक नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सोमवारी विरोधकांवर केली.

कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या सहजानंद चौक येथील निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. भिवंडी शहर, ग्रामीण येथील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री भिवंडी येथे येणार होते. तत्पूर्वी त्यांनी कल्याणचा धावता दौरा केला.

हेही वाचा…लाडकी बहीण योजनेमुळे राजकीय पक्षांना प्रचाराचा ‘लाभ’, राजकीय पुढाऱ्यांचे उखळ पांढरे

u

लाडकी बहिण योजनेमुळे महिला स्वयंअर्थपूर्ण होत आहेत. त्यांना आर्थिक आधार मिळाला आहे. या योजनेचा महायुती सरकारला लाभ होईल या भीतीने महाविकास आघाडीने या योजनेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. पण न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले. आमचे सरकार महाराष्ट्रात आले तर या सर्व योजनांची चौकशी करण्याचे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. चांगल्या कामात अडथळे आणण्याचे काम महाविकास आघाडीचे नेते करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

आम्ही लोकांच्या विकासाचे असेल ते त्यांना भरभरून देतो, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंनी आमची देना बँक आहे. लेना बँक नाही, अशी मिश्किल टिपणी केली. महायुती सरकारने नागरी हिताच्या अकरा योजना सुरू केल्या आहेत. त्या बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे महाविकास आघाडीचे नेते बोलत आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा स्वार्थ यामध्ये दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा…निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज

लाडकी बहिण योजनेसह इतर योजनांची चौकशी करण्याची भाषा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. तुम्ही सर्व प्रकारच्या चौकशा करा. त्यात तुम्हाला काही भेटणार नाही. वेळ आली तर लाडकी बहिण योजनेसाठी आम्ही एकदा नाही तर दहा वेळ तुरूंगात जायला तयार आहोत, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले.जे जनहिताच्या कामांमध्ये खोडे घालत आहेत त्यांना आता जनतेने जोडा दाखवावा. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भिवंडी ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, अरविंंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील उपस्थित होते.