डोंबिवलीकर मूळ निवासी असलेला आणि नोकरी निमित्त अमेरिकेत स्थायिक असलेला एक अमेरिकन नागरिक डोंबिवलीत सुट्टीनिमित्त आला आहे. या नागरिकाला फडके रस्त्यावर दोन महिलांनी गाठून आमच्या घरातील एक जण खूप आजारी आहे. औषध खरेदीसाठी आमच्याजवळ पैसे नाहीत, असे सांगून त्यांच्याकडून ९०० रुपयांची औषधे खरेदी केली आहेत. हा फसवणुकीचा अनुभव मागील काही दिवसांपासून डोंबिवलीतील नागरिक घेत आहेत.
फडके रस्त्यावरील काही औषध विक्रेत्यांना काही ठराविक महिला एका नागरिकाला घेऊन दुकानात येतात. स्वता औषधे खरेदी करुन सोबत घेऊन आलेल्या नागरिकाला पैसे देण्यास सांगत आहेत, असा अनुभव येत आहे. फडके रस्त्यावरी काही पान टपरी चालकांना काही महिला नागरिकांची औषध खरेदीमधून फसवणूक करत असल्याचे लक्षात आले आहे.
हेही वाचा >>>प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या
मिळालेली माहिती अशी, प्रसाद दीक्षित हे मूळ डोंबिवलीकर आहेत. ते नोकरी निमित्त अमेरिकेत स्थायिक आहेत. सुट्टी घेऊन ते डोंबिवलीत आले आहेत. दोन दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेत ते फडके रस्त्यावरील मदन ठाकरे चौकातून चालले होते. यावेळी त्यांना दोन महिलांनी थांबविले. आमच्या घरातील एक व्यक्ति खूप आजारी आहे. ती व्यक्ति अस्वस्थ आहे. त्यांना औषधोपचरांची गरज आहे. आमच्या जवळ पैसे नाहीत. अतिशय व्याकुळतेने या महिला औषध खरेदीसाठी पैशाची मागणी करत असल्याने प्रसाद दीक्षित यांनी या महिलांना ९०० रुपयांची औषधे फडके रस्त्यावरील एका औषध दुकानातून खरेदी करुन दिली. आपण महिलांकडून फसविले जात आहोत याची थोडीही जाणीव दीक्षित यांना आली नाही.
चौकामध्ये या महिला दीक्षित यांच्याशी बोलत असताना एक पानटपरी चालक त्यांना तुम्ही तेथून निघून जा, असा इशारा करत होता. तो इशारा दीक्षित यांच्या निदर्शनास आला नाही. दीक्षित यांनी आपल्या मित्रांना घडला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांना त्या महिला अशाप्रकारे खोटे सांगून नागरिकांची फसवणूक करत आहेत, असे सांगितले. त्यावेळी त्यांना आपण फसविले गेलो असल्याचे जाणवले.
हेही वाचा >>>प्रेमसंबंधातून कल्याणमध्ये मानखुर्दच्या तरुणाची हत्या
फडके रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा, बहुतांशी नोकरदार, व्यापारी या रस्त्यावरुन येजा करतात. हे हेरुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महिला या रस्त्यावर उभ्या राहतात. सुस्थितीत असलेली व्यक्ति पाहून त्याच्या समोर रडगाणे सुरू करतात, असे फडके रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांनी सांगितले. मुलुंड येथील एका डाॅक्टरच्या औषध चिठ्ठीचा वापर या महिला करतात.
औषध दुकानातून खरेदी केलेली औषधे या महिला नंतर दुसऱ्या औषध दुकानात नेऊन आमच्या नातेवाईक रुग्णाला रुग्णालयातून सोडले आहे. त्याची वाढीव औषधे आम्हाला उपयोगाची नाहीत. ती तुम्ही परत घ्या, असे सांगून ती औषधे निम्म किंमतीत औषध विक्रेत्यांना विकतात, अशी माहिती आता पुढे येत आहे. स्थानिक पोलिसांनी फडके रोडवर गस्त घालून या महिलांना ताब्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हेही वाचा >>>डोंबिवलीतील रिक्षा चोराला सागर्ली गावातून अटक
“ फडके रस्त्यावरुन जात असताना अतिशय रडवेल्या स्थितीत दोन महिला अचानक समोर आल्या. घरातील सदस्य खूप आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. त्याला औषधांची गरज आहे. आमच्या जवळ पैसे नाहीत. त्यामुळे तुम्ही औषधांसाठी पैसे द्या अन्यथा औषधे खरेदी करून द्या अशी मागणी करू लागल्या. हा फसवणुकीचा प्रकार भयानक आहे.”-प्रसाद दीक्षित,अमेरिकन नागरिक