पूर्वी रोमन साम्राज्यात बैलांना पकडण्यासाठी, अस्वलांच्या शिकारीसाठी, खेळासाठी काही श्वानांचा उपयोग होत होता. मूळचे अमेरिकेतील असलेले अमेरिकन पिट बुल टेरिअर हे श्वान जगभरात लोकप्रिय आहेत. दिसायला मध्यम आकाराचे, रुबाबी व्यक्तिमत्त्वाचा दरारा यामुळे काही श्वान जाती जगभरात लोकप्रिय आहेत. काही देशांमध्ये या जातीच्या श्वानांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. आकर्षक शरीरयष्टी असली तरी स्वभाव शांत आणि खेळकर असल्यामुळे या श्वानांपासून धोका नाही. अठराव्या शतकापासून या श्वानांनी आपली लोकप्रियता जपली आणि जगभरात आपले व्यक्तिमत्त्व सिद्ध केले. चुकीच्या पद्धतीच्या प्रशिक्षणामुळे या श्वानांकडून काही हल्ले झाल्यामुळे लोकांमध्ये या श्वानांविषयी दहशत निर्माण झाली. १९ व्या शतकात अमेरिका आणि ब्रिटन या देशात बेकायदेशीररीत्या श्वानांच्या झुंजीसाठी अमेरिकन पिट बुल टेरिअर या श्वानांचा उपयोग केला जायचा. कालांतराने पशूविषयक कायद्यानुसार यावर बंदी आणण्यात आली. मुळात या श्वानांचा स्वभाव शांत आहे. नव्वदच्या दशकातदेखील या श्वानांचा उपयोग चुकीच्या पद्धतीने केला असल्याने काही लोकांना जीव गमवावा लागला. प्रशिक्षण चुकीचे असल्यावर या श्वानांची कृती चुकीची हे समीकरण श्वानप्रेमींनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खेळकर स्वभाव असल्याने कोणत्याही परिस्थितीत हे श्वान उत्तम जगतात. असे असले तरी या श्वानांच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, मलेशिया, सिंगापूर अशा काही देशांमध्ये या श्वानांना पाळण्यास बंदी आहे. ज्या देशांमध्ये या श्वानांच्या पालनास परवानगी देण्यात आली आहे, त्यासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. मजबूत शरीरयष्टी, प्रचंड आत्मविश्वास, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्ती शोधून काढणे यासाठी अमेरिकन पिट बुल टेरिअर या श्वानांची उपयुक्तता आहे. सैन्य दल, सुरक्षा दल, नार्को टेस्ट या ठिकाणी या श्वानांची मागणी मोठय़ा प्रमाणात आहे. भारतात पंजाब येथे मोठमोठय़ा शेतजमिनींचे रक्षण करण्यासाठी अमेरिकन पिट बुल टेरिअर श्वानांचा उपयोग करतात.
गर्दीची सवय हवी
सुरुवातीपासूनच अमेरिकन पिट बुल टेरिअर या श्वानांना माणसांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी राहण्याची सवय करून द्यावी लागते. आज्ञेचे पालन करणे याची सवय प्रशिक्षणाच्या दरम्यान व्हावी लागते. जी कृती या श्वानांना प्रशिक्षकाच्या मार्फत करायला सांगितली जाते, ती कृती हे श्वान त्वरित करतात.
अंध व्यक्तींना दिशा दाखवणारे श्वान
अमेरिकन पिट बुल टेरिअर या श्वानांचे विशेष वैशिष्टय़ म्हणजे अंध व्यक्तींना दिशा दाखवण्याचे महत्त्वाचे काम हे श्वान करतात. या श्वानांना एखाद्या अवघड कामाचे विशेष आकर्षण असते. थकणे या श्वानांना जणू ठाऊकच नाही. सतत काहीतरी कृती करत राहिल्याने शारीरिक आणि मानसिकरीत्या हे श्वान अधिक सुदृढ राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वभाव शांत, पण चुकीचे प्रशिक्षण नको
अमेरिकन पिट बुल टेरिअर या श्वानांचा स्वभाव मुळात शांत आहे. खेळकर वृत्तीने आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे कसब या श्वानांमध्ये आहे. मात्र या श्वानांना सांभाळताना प्रशिक्षणाची महत्त्वाची भूमिका मालकाला सांभाळावी लागते. ज्या प्रकारचे प्रशिक्षण त्या प्रकारची कृती ही बाब या श्वानांच्या मालकांनी कायम ध्यानात घ्यायला हवी. स्वभाव शांत असला तरी हिंसक वृत्तीचे प्रशिक्षण या श्वानांना दिल्यास अमेरिकन पिट बुल टेरिअर या श्वानांपासून धोका संभवू शकतो. या श्वानांच्या स्वभावाची उत्तम जाण असलेल्या प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. प्रशिक्षकाने मारहाण करून प्रशिक्षण दिल्यास या श्वानांचा स्वभाव रागीट होण्याची शक्यता असते. मैदानात धावणे, फेकलेला चेंडू परत आणून देणे, पळायला लावणे यासारखे शारीरिक व्यायाम करून घेतल्यास आणि उत्तम दर्जाचा आहार दिल्यास अमेरिकन पिट बुल टेरिअर घरात पाळण्यासदेखील उत्तम आहेत.