इडली, डोसा, वडापाव, मिसळ या अस्सल भारतीय पदार्थासोबत पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, मोमोज अशा पाश्चिमात्य पदार्थानी भारतीय खवय्यांची भूक भागवण्यास सुरुवात केली आहे. या पाश्चिमात्य पदार्थाच्या पंक्तीत स्पेन आणि पोर्तुगाल देशातील ‘चुरोज’ या पारंपरिक खाद्यपदार्थाने प्रवेश केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पारंपरिक खाद्य, संस्कृती, राहणीमानाची पद्धत, विचार यांवर पडलेल्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे तरुणाईच्या सर्वच गोष्टींमध्ये पाश्चिमात्य ‘ट्विस्ट’ पाहायला मिळतो. खाण्या-पिण्याच्या सवयी असो किंवा राहणीमानाच्या, आजच्या तरुणाईने अगदी सहजतेने आपल्याशा केलेल्या या पाश्चिमात्य सवयींमुळे पाश्चिमात्य देशातील रंगढंग आपल्या रोजच्या जीवनात अगदी सहज उतरू लागले आहेत.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या ठाणे शहरात नाक्यानाक्यावर मिळणाऱ्या पन्हं, चिरोटे, अप्पम अशा पारंपरिक पदार्थाबरोबरच तरुणाईचे नवे अड्डे बनलेल्या फ्रेन्च फ्राईज, सोडा पब, मोमोज अशा पदार्थाची दुकाने वाढत चालली आहेत. याच दुकानांमध्ये भर म्हणून आता ‘अमोर चुरोज’ या नव्याने खुल्या झालेल्या दुकानातही तरुणाईची वर्दळ वाढत आहे.

स्पेन, पोर्तुगाल या देशांमध्ये सकाळच्या न्याहरीमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या या चुरोजने ठाणेकरांची चांगलीच पसंती मिळवली आहे. येथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या चवीच्या चुरोजमुळे चहाच्या टपरीवर उभे राहून किंवा वडापावच्या गाडीवर भेटणारी मुले आता या दुकानात गर्दी करत आहेत.

मैद्याचे पीठ, पाणी आणि मीठापासून तयार केले जाणारे चुरोज हे चकली तयार करतात, तशा साच्यामधून काढले जातात. हे चुरोज वेगवेगळ्या आकारामध्ये मिळतात. तेलात तळल्यानंतर या पदार्थाचे बाहेरील आवरण काहीसे कडक होते. त्यावर साखरेची पावडर किंवा दालचिनीची पावडर टाकून चॉकलेटमध्ये बुडवून खाल्ले जाते. अमोर चुरोज येथे पारंपरिक चुरोज ओरीओ, रेड वेलवेट, नटेलाबर्स्ट आणि चॉकलेट ऑरेंज सिल्क या चवींमध्ये मिळते. या चुरोजसोबत व्हाइट चॉकलेट, स्पॅनिश चॉकलेट, नटेला, काजू, मध असे विविध ‘डीप’ मिळतात.

येथे मिळणारा आइस्क्रीम चुरोज तरुणाईच्या खास पसंतीस उतरले आहेत. वर्तुळाकार चुरोजमध्ये व्हेनिला आइस्क्रीम किंवा चॉकलेट आइस्क्रीम आणि त्यावरून मधाची, चॉकलेट, सॉसची सजावट केली जाते. सेवरी चुरोज या प्रकारात चुरोजला पिझ्झाची काहीशी चव दिली जाते. ऑरीगॅनो घालून शिजवलेले हे चुरोज पिझ्झा डीपसोबत दिले जातात.

चुरोज सोबतच येथे हेजलनट शेक, चॉकलेट, शेंगदाणे आणि कॅरेमल यांची स्मूदि, व्हॅनिलाच्या चवीचा ओरीओ शेक, ब्लूबेरी शेक, मिंटयुक्त पोलो शेक, बोर्नव्हिटा, सॉल्टेड कॅरेमिल बनाना, ओट्स आणि खजुराचा शेकही येथे उपलब्ध आहेत. काचेच्या बाटल्यांमधून दिली जाणारी ही पेय विशेष आकर्षित करतात.

ठाण्याच्या पाचपाखाडी परिसरातील स्नेहा वैद्य यांच्या या ‘अमोर चुरोज’ कॅफेमध्ये प्रवेश करताच बाहेर ठेवण्यात आलेली बाकडी आणि आजूबाजूला असलेल्या लाल फुलांच्या वेलींमुळे या कॅफेला काहीसा आधुनिक साज येतो. कॅफेमध्ये प्रवेश करताच दोन्ही बाजूला उंच अशा टेबलवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. समोरच कॅफेचे स्वयंपाकघर आहे. त्यामुळे खुसखुशीत चुरोज तयार होताना पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटते. अगदी २०० ते ३०० रुपयांच्या घरात आपल्याला हवा त्या चवीचा चुरोज आणि त्याच्या जोडीला डीप आपण निवडू शकतो. अमोर म्हणजे स्पॅनिश भाषेत प्रेम, कॅफेच्या नावाप्रमाणेच या चुरोजच्या प्रेमात पडला नाहीत तर नवलच असे स्नेहा वैद्य सांगतात. आपल्याला मिळणारी पॉकेटमनीची बचत करून कधीतरी मित्रांबरोबर बाहेर जाऊन चमचमीत पदार्थावर ताव मारण्यासाठी हे अगदी उत्तम ठिकाण आहे.

  • पत्ता – शॉप क्र.१, गगनगिरी सोसायटी, हॉटेल मालवणच्यासमोर, पाचपाखाडी, ठाणे (प.)
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amor churros dessert shop thane panchpakhadi