कल्याण – एकात्मिक हमीभाव भात खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी शासनाला विक्री केलेल्या भाताची रक्कम ३१ मार्च अखेर आली तरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यातील शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या रकमेतून शेतकरी ३१ मार्चपूर्वी मागील वर्षभरात शेती, पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करतात. ही परतफेड ३१ मार्चपूर्वी केली नाहीतर १ एप्रिलपासून बँका शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर व्याज लावण्यास सुरुवात करतात.

जानेवारीमध्ये एकात्मिक हमीभाव योजनेंतर्गत शहापूर, मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाताची विक्री केली. या विक्रीचे पैसे यापूर्वी शेतकऱ्यांना महिनाभरात मिळत होते. आता तीन महिने उलटले तरी ही रक्कम न मिळाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. विक्रीनंतर यापूर्वी एक ते दीड महिन्यात शेतकऱ्याच्या जिल्हा बँकेतील खात्यात थेट भात विक्रीचे पैसे जमा होत होते. हे पैसे मिळाल्यानंतर शेतकरी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाऊ रकमेची परतफेड या रकमेतून करतो.

ही रक्कम ३१ मार्चपूर्वी भरणा केली की नवीन वर्षात पुन्हा शेतीसाठी बँकेकडून, स्थानिक आदिवासी सेवा सोसायटीकडून कर्ज घेणे शेतकऱ्यांना सोयीस्कर पडते. ही रक्कम ३१ मार्चपूर्वी भरणा केली नाहीतर बँकेकडून, सेवा सोसायटीकडून शेतकऱ्याच्या कर्जावर व्याज लागू होते. आता भात विक्रीची रक्कम हातात नाही. मार्चअखेर संपण्यास दहा दिवस शिल्लक आहेत. मग कर्जफेड करायची कशी असा प्रश्न मुरबाड, शहापूरमधील शेतकऱ्यांना पडला आहे.

एकात्मिक भात खरेदी योजनेंतर्गत आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली मुरबाड तालुक्यात सुमारे पाच हजार शेतकऱ्यांनी भाताची विक्री केली आहे. यामधील ५५० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. शहापूर तालुक्यात मागील तीन वर्षात हमीभाव भात खरेदी योजनेत कोट्यवधीचा गैरव्यवहार झाला आहे. या भागातील खरेदी केंद्रे उशिराने सुरू झाली आहेत. ही केंद्रे सुरू करण्यासाठी प्रहार संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष वसंत पानसरे यांनी आंदोलन केले होते.

शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वी भात विक्रीची रक्कम देण्यात यावी यासाठी मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.

मागील दोन वर्षात शहापूर येथे हमीभावाने भात खरेदी केंद्रात अनेक गैरव्यवहार झाले. त्यामुळे हमीभावाने भात विक्री करणाऱ्या आता प्रत्येक शेतकऱ्याच्या सात बारा उताऱ्याची स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर खात्री करण्यात येत आहे. त्यामुळे थोडा विलंब होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत रक्कम देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.-गणेश वालदे, व्यवस्थापक, आदिवासी विकास विभाग.

हमीभावाने भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना विहित वेळेत त्यांची रक्कम मिळण्यासाठी आदिवासी विभागाने प्रयत्न करावेत. अन्यथा प्रहार संघटना आंदोलन करील.- वसंत पानसरे, प्रहार संघटना, शहापूर.

३१ मार्चपूर्वी हमीभावाने भात विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली पाहिजे. ती रक्कम मिळण्यास विलंब होत असेल तर बँकांनी शेतकऱ्यांच्या शेती कर्जावर १ एप्रिलनंतर व्याज लावू नये. ते माफ करावे.-गोटीराम पवार, माजी आमदार, मुरबाड