ठाणे : अंबरनाथ शहराच्या सांस्कृतिक जडघडणीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या ग्रंथाभिसरण सार्वजनिक वाचनालयाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १ ते ३ डिसेंबर असे तीन दिवसीय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात हे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ येथे असणारे ग्रंथाभिसरण मंडळ सार्वजनिक वाचनालय शहरातील सर्वात जुने वाचनालय म्हणून ओळखले जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित “अ तालुका” दर्जा प्राप्त हे ग्रंथालय शहरातील एकमेव ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात महत्त्वपूर्ण व दुर्मिळ संदर्भ ग्रंथासह सुमारे ४२ हजार ग्रंथसंख्या तसेच १०० च्या नियतकालिके आहेत. तसेच होतकरू व गरजू विद्यार्थ्यांसाठी नाममात्र शुल्कांत अभ्यासिकेची सोय व मोफत इंटरनेट सेवाही ग्रंथालयाच्या मार्फत पुरविण्यात येते. मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील एकूण १२ वर्तमान पत्रे दररोज संस्थेत उपलब्ध असतात. ग्रंथालयाचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : वीज चोरी करत असाल तर सावधान; होऊ शकतो गुन्हा दाखल

यामध्ये १ डिसेंबर रोजी ज्येष्ठ वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा भारतीयांचा प्राचीन ज्ञान खजिना या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तर २ डिसेंबर रोजी जीवनशैली बदलातून वजन कमी करणे आणि मधुमेह मुक्ती विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि ३ डिसेंबर रोजी दिपाली केळकर या शब्दांच्या गावा जावे हा कार्यक्रम सादर करणार आहे. अंबरनाथ पूर्व येथील रोटरी क्लब सभागृहात सायंकाळी ५.३० वाजत हे सर्व कार्यक्रम पार पडणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे यांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrit mahotsav celebration of granthabhisaran library organizing various cultural programs at ambernath css
Show comments