डोंबिवली लहान, आटोपशीर होती, तेव्हा शहरात चोखंदळ वाचक होते. या रसिक वाचकांची वाचनाची भूक भागविण्यासाठी शहराच्या विविध भागांत चाळीस ते बेचाळीस वाचनालये होती. नव्वदच्या दशकानंतर शहराचे नागरीकरण झाले. कुटुंबाचा पसारा वाढला. नवीन गगनचुंबी इमारतींमध्ये काही रहिवासी निघून गेले. लोकलच्या गर्दीत पुस्तके हरवून गेली. आताच्या ऑनलाइन युगात उत्तरोत्तर भौतिक सुखाच्या मागे लागलेला रहिवासी वाचनालय, पुस्तक, वाचन यांना दुय्यम स्थान देऊ लागला. त्याचा परिणाम वाचनसंस्कृती रोडावण्यावर, वाचनालये बंद पडण्यावर झाला. स्थित्यंतराच्या या प्रक्रियेचे एक साक्षीदार सुरेश देशपांडे यांच्याशी साधलेला संवाद..
सुरेश देशपांडे, अमृता वाचनालयाचे संस्थापक व आरती प्रकाशनचे संचालक
* आताच्या तुलनेत तीन दशकांपूर्वी डोंबिवली शहर लहान असूनही ३५ ते ४० वाचनालये होती. आता महानगर झाले, पण वाचनालयांची संख्या वाढली नाहीच, उलट कमी झाली. याचे कारण काय?
डोंबिवलीत साहित्यिक, सांस्कृतिक विचारांच्या परिघात वावरणारा एक विचारी वाचनवेडा वाचक वर्ग राहत होता. तेव्हा दूरचित्रवाणीचा एवढा प्रभाव नव्हता. आकाशवाणीवरील बातम्या आणि कार्यक्रम हेच रहिवाशांचे विरंगुळ्याचे साधन होते. वाचनासाठी घरात पुरेसा वेळ असायचा. सुशिक्षित चाकरमानी वर्ग दररोज नोकरीनिमित्त मुंबईत लोकलने येताना-जाताना सवा ते दीड तासाच्या प्रवासात वर्तमानपत्र, जवळील कथा-कादंबरी, वैचारिक, ललित, आवडीची इंग्रजी पुस्तके अशा अनेक प्रकारच्या वाचनाला प्राधान्य द्यायचा.
* वाचनालयांच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचनालय चालकांकडून कोणते प्रयत्न केले जात होते?
वाचनालयात येणारा काही वाचक वर्ग हा विशिष्ट कथा, कादंबऱ्या व अन्य पुस्तकांमध्ये अडकून पडलेला असायचा. तेव्हा ग्रंथपाल इतर विषयांची, निरनिराळ्या लेखकांची पुस्तके वाचा, असे वाचकांना सुचवीत असत. त्यातून वाचकांचे चौफेर वाचन होई. वाचकही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत असत. वाचकांना नवीन साहित्य वाचायला मिळावे म्हणून बाजारात येणारे नवीन पुस्तक तात्काळ वाचनालयात उपलब्ध करून देण्यात येत होते.
* वाचकांच्या अभिरुची बदलासाठी कोणते प्रयत्न केले जात होते?
आठवडय़ातील रविवार हा एक दिवस सुट्टीचा असायचा. या दिवशी लेखक, साहित्यिक, व्यासंगी मंडळी वाचनालयात जमत असत. टपरीवरून मागविलेल्या चहाचा आस्वाद घेत गप्पांची मैफल वाचनालयाच्या आटोपशीर जागेत रंगत असे. साहित्यिक, पुस्तक, ग्रंथांमधील विषयांच्या चर्चा या गप्पांमध्ये रंगत. आपण ज्या लेखकाचे पुस्तक वाचतो, तोच आपल्यासमोर असल्याने, आपली मते थेट लेखकासमोर व्यक्त करण्याची संधी वाचकांना मिळायची. त्यामधून लेखक आणि वाचक यांचा थेट संवाद वाचनालयाच्या व्यासपीठावर व्हायचा.
* वाचकांनी वाचनालयाकडे पाठ फिरवलीय आहे, असे वाटते का?
पुस्तकप्रेमी, वाचनवेडय़ांना दर्जेदार साहित्यिविषयक खाद्य वेळीच पुरवले तर त्यांना वाचत राहा म्हणून सांगावे लागत नाही. ते आपोआप वाचनालयाकडे वळतात. यापूर्वी वाचक वाचनालयात आला, की आता मी काय नवीन वाचू, असा एक प्रश्न असायचा. त्याला मार्गदर्शन केले, की त्याप्रमाणे तो संबंधित पुस्तकाच्या मागे लागायचा. आता प्रत्येक जण उदरनिर्वाहाचे साधन, नोकरी, आयुष्याचा पुढचा सुखकर प्रवास अशा भौतिक सुखाच्या मागे अधिक लागला आहे. आवड आहे, पण सवड नाही, अशीही अनेकांची स्थिती आहे. काही वाचक ऑनलाइन वाचू लागले आहेत.
* गेल्या ३५ वर्षांत डोंबिवलीतील ३२ वाचनालये बंद पडली,यामागचे कारण काय?
डोंबिवलीच्या विविध भागांत केशव, अमृता, ज्ञानविकास, साईनाथ, गजानन, समाधान, अप्सरा अशी एकूण सुमारे ४२ वाचनालये होती. काळाच्या ओघात त्यातील ३२ वाचनालये बंद पडली.
* आपण ‘अमृता वाचनालय’ चालवीत होता. त्याचा अनुभव काय?
मी स्वत: प्रकाशक असल्याने वाचन, लिखाणाची आवड होती. सतत पुस्तकांची उलाढाल होत असे. अमृता वाचनालयाचे ७०० सभासद होते. हळूहळू वाचक दुरावत गेला. नाइलाजाने ‘अमृता’ वाचनालय बंद करावे लागले.
* शाळांमधील वाचनालये मुलांना वाचनप्रेमी करू शकत नाहीत का?
शाळेच्या ग्रंथालयांमध्ये मराठी, इंग्रजी भाषेतील विविध प्रकारची पुस्तके, ग्रंथ असतात. कार्यानुभवाच्या तासाला एखादे पुस्तक घेऊन त्याचे विद्यार्थ्यांकडून नियमित वाचन करून घेतले तर वाचनसंस्कृती विद्यार्थ्यांच्या गळी उतरवता येऊ शकते. विद्यार्थ्यांना पुस्तके वाचायला देऊन त्या पुस्तकावर आधारित निबंध स्पर्धा घ्यायच्या.अलीकडे शिक्षकांना शाळेसह शाळाबाहय़ विविध कामांत शासनाने अडकवून टाकले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचकसंस्कृतीकडे वळविण्याच्या कामासाठी शिक्षकांना वेळ नाही.
* ऑनलाइन पुस्तक खरेदी-विक्रीचा वाचनालयांवर परिणाम झालंय का?
ऑनलाइन पुस्तक खरेदी केली की थेट आपल्या संगणक, लॅपटॉप, स्मार्ट भ्रमणध्वनीत पुस्तक येऊन पडते. अशा पुस्तकासाठी कपाट, कप्प्याची आवश्यकता लागत नाही. प्रवासात, उभ्या उभ्या अशी पुस्तके वाचनाची सोय असते. आताचा ‘स्मार्ट वाचक’ ऑनलाइन पुस्तक खरेदीला प्राधान्य देत आहे.
* ग्रंथालये टिकवताना, वाचनसंस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी कोणते प्रयत्न आवश्यक आहेत?
ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून, कोलकाता येथील राजा राममोहन राय फाऊंडेशनच्या माध्यमातून ग्रंथालयांचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी, वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शासनाने ग्रंथालयांचे अनुदान वाढवून देऊन तुटपुंज्या निधीत ग्रंथालय चालविणाऱ्या चालकांना साहाय्य केले पाहिजे. विकासकांनी सदनिका बांधताना देवघराबरोबर पुस्तके ठेवण्यासाठी सक्तीचे कपाट करून दिले, तर घराघरांत पुस्तकांची किमान चर्चा सुरू होईल. पर्यटन केंद्र, रेल्वे स्थानकांच्या परिसरात ‘विरंगुळा’ वाचनालये उपलब्ध करून दिली पाहीजेत. येणाऱ्या काळात इंग्रजीच्या वाढत्या अतिक्रमणामुळे मराठी भाषा, वाचनसंस्कृती, ग्रंथालय चळवळीला सहजसुलभ पुढचा प्रवास करता येईल. अन्यथा, येत्या २५ वर्षांत वाचनालय, ग्रंथालयांचा विचारच करायला नको. या धोक्याबरोबर मराठी प्रकाशन व्यवसाय अडचणीत येऊन, मराठी भाषा फक्त बोलीभाषेपुरती शिल्लक राहते की काय अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
भगवान मंडलिक

Story img Loader