‘थांबला न सूर्य कधी, थांबली ना धारा.. धुंद वादळास कोठला किनारा.., वैराण वाळवंटी मी सूर्य फुलविताना, आली नवी उभारी, माझ्या जुन्या व्यथांना.., मी मागितली श्रीमंती सौख्यात राहावे म्हणूनी, मज दारिद्रय़ची मिळाले मी शहाणे व्हावे म्हणूनी.., शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गायी, दु:ख उधळायास आता आसवांना वेळ नाही.., नसतात क्षितिजे उंच कधी..’ अशा शब्दांतून जगण्याचे वास्तव मांडणारे थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे साहित्य रसिकांनी अनुभवले. लोकबिरादरी मित्रमंडळ आयोजित आणि सो-कुल संस्था निर्मित बाबा आमटे यांच्या साहित्यावर आधारित ‘करुणोपनिषदे’ या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण रविवारी करण्यात आले.डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात हा कार्यक्रम पार पडला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची निर्मिती असलेल्या या कार्यक्रमातून अभिनेते सचिन खेडेकर, गायिका अंजली मराठे, लेखक-दिग्दर्शक चंद्रकांत काळे आदी कलाकारांनी बाबा आमटे यांचे गद्य आणि पद्य स्वरूपातील साहित्य रसिकांसमोर खुले केले. त्यांना नरेंद्र भिडे यांच्या संगीताची आणि अपूर्व द्रवीड यांच्या तबल्याची साथ लाभली. गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम अशा भागात हेमलकसा, आनंदवनसारखे प्रकल्प उभारताना आलेल्या अडचणी, अनुभव, कुष्ठरोग्यांची सेवा करताना अनुभवलेले आणि असह्य़ वेदनांनी भरलेल्या आयुष्याचे संचित बाबा आमटे यांनी लिहून ठेवले आहे. वेदनांचे वेद म्हणणाऱ्या आमटे यांच्या कवितांनी रसिकही भारावून गेले. त्यांनी लिहिलेल्या उताऱ्यांतून आणि रचलेल्या कवितांतून जगण्याचे सत्य अगदी चपखलपणे मांडण्याचा प्रयत्न यावेळी सोनाली आणि सचिन खेडेकर यांनी केला. आनंदवनाचे कार्य अगदी जवळून अनुभवलेल्या सोनाली कुलकर्णी यांनी बाबा आमटे यांची साहित्यकृती जगभरातील प्रत्येकापर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती केल्याचे सांगितले. तर बाबांचे साहित्य या निमित्ताने समोर आल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे मत बाबा आमटे यांचे नातू अनिकेत आमटे यांनी व्यक्त केले. हेमलकसा हा भाग अतिदुर्गम असून येथील गावांतही शिक्षण व आरोग्याच्या संधी उपलब्ध करून द्या, असा आग्रह तेथील लोक करत आहेत. या लोकाग्रहास्तव त्या गावात शिक्षण देण्यासाठी शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. निलगुंडा या गावी साधना विद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. ३ ऑगस्टपासून ही शाळा सुरू झाली असून, बालवाडी ते दुसरीपर्यंतचे वर्ग येथे भरतात. त्यात ५२ मुले शिक्षण घेत आहेत. पहिली ते पाचवीपर्यंत ही शाळा चालवण्याचा मानस आहे, त्यासाठी निधीची आवश्यकता असल्याने या कार्यक्रमाचे प्रयोग सगळीकडे करण्यात येत आहेत. डोंबिवलीतील प्रयोग हा चौथा प्रयोग असून डोंबिवलीकरांनीही त्याला उत्तम साथ दिल्याचे अनिकेत आमटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. हेमलकसा, गडचिरोली आदी भागातील आदिवासी, कुष्ठरोगी यांना मायेचा हात देणाऱ्या आमटे कुटुंबीयांप्रती ऋण व्यक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सोनाली कुलकर्णी यांनी सांगितले.

हेमलकसा हा नक्षलग्रस्त भाग असल्याने सर्वाना नक्षलवाद्यांची भीती वाटते, परंतु त्यांनी गावकऱ्यांना शिक्षण, आरोग्य या सोयीसुविधा देताना आम्हाला कधी विरोध केला नाही.
अनिकेत आमटे
प्रकाश बाबा आमटे चित्रपटाच्या निमित्ताने मी आमटे परिवारातीलच एक झालो. समाजासाठी जगावे कसे, याचा मार्ग बाबा आमटे यांनी दाखवलेला आहे. त्यांनी केलेले कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न.
सचिन खेडेकर, अभिनेता

Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
News About Marathi Drama Urmilyan
‘उर्मिलायन’ महाकाव्यातून उलगडणार रामायणातील लक्ष्मणच्या पत्नीचं कथाख्यान, ‘या’ दिवशी होणार शुभारंभाचा प्रयोग
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Veteran cartoonist Shi da Phadnis debuting at 100 shared his life journey expressing I wanted to be a Phadnis
‘मला शि. द. फडणीस व्हायचे होते’ शंभरीत पदार्पण केलेल्या शिदंची भावना
Cyclone Fengal caused rain in Sindhudurg mdisrupting mango blooming due to changing weather conditions
थंडी गायब…आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रियेत खोडा
Story img Loader