कल्याण – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात एमएमआरडीएतर्फे काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीनेही काही ठिकाणी वाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम केले आहे. या खोदकामांमुळे डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवर काही दिवसांपासून वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित कामांच्या ठिकाणी किमान तीन वाहतूक सेवक तैनात करण्याच्या सूचना पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डोंबिवली पूर्वेतील सर्वेश सभागृह ते पी. पी. चेंबर्स माॅल हा मुख्य वर्दळीचा रस्ता काँक्रीट कामासाठी खोदण्यात आला आहे. वर्दळीचा रस्ता खोदण्यात आल्याने टिळक रस्ता आणि जवळच्या इतर रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीमुळे स्थानिक रहिवाशांसह नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत. ही कामे सुरू असलेल्या भागातील रहिवाशांना आपली वाहने इमारतींच्या आवारातून बाहेर काढणे शक्य होत नाही. दरम्यान, रस्ते कामे करताना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि या वाहतूक कोंडीवर पालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे, वाहतूक अधिकारी, एमएमआरडीए अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत आमदार चव्हाण दूरदृश्यप्रणालीतून सहभागी झाले होते.

हेही वाचा – कल्याण : काळा तलाव साफसफाईत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची कारवाई

डोंबिवलीतील रस्ते कामांचा प्रवाशांसह नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. संबंधित कामांच्या ठिकाणी होणारी वाहन कोंडी टाळण्यासाठी पालिकेने त्या ठिकाणी किमान ५० वाहतूक सेवक तैनात करण्याची व्यवस्था करावी. सुरू असलेली रस्ते विनाविलंब विहित वेळेत पूर्ण करावेत, अशा सूचना आमदार रवींद्र चव्हाण यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या. डोंबिवली वाहतूक विभागाने शहरात सुरू असलेली रस्ते कामे आणि इतर चौक, रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी ५० वाहतूक सेवकांची मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. आयुक्त डाॅ. जाखड यांनी सर्वेश सभागृह ते पी. पी. चेंबर्स माॅल, डाॅ. राजेंद्र प्रसाद रस्ता, सावरकर रस्ता परिसरात काँकीट रस्ते कामे सुरू असलेल्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएने अतिरिक्त वाहतूक सेवक उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना केली. महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी सेवा वाहिन्या टाकण्यापूर्वी वाहतूक विभागाला पूर्व सूचना द्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

डोंबिवलीतील काँक्रीट रस्ते कामे करताना प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना वाहन कोंडी किंवा इतर कोणताही त्रास होता काम नये. ही कोंडी टाळण्यासाठी वाढीव वाहतूक सेवक तैनात करावेत, अशा सूचना पालिकेला केल्या आहेत. – रवींद्र चव्हाण, आमदार, डोंबिवली.

हेही वाचा – डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे

रस्ते कामांच्या ठिकाणची कोंडी सोडविण्यासाठी वाढीव वाहतूक सेवक उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना एमएमआरडीएला केल्या आहेत. पालिका, वाहतूक विभाग, एमएमआरडीए यांनी कामे करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. – डाॅ. इंदुराणी जाखड, आयुक्त.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An army of traffic servants at a concrete road work site in dombivli ssb