कल्याण – कल्याण जवळील म्हारळ येथील उल्हासनगर महापालिका सर्वोपचारी रुग्णालयात येऊन एका कर्मचाऱ्याला म्हारळमधील एका रहिवाशाने शुक्रवारी मारहाण केली आहे. रुग्णालयातील प्रतिबंध असलेल्या दालनात येऊन ही मारहाण झाल्याने उल्हासनगर महापालिका सर्वोचपचारी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. अनिल पाटील असे मारहाण करणाऱ्या रहिवाशाचे नाव आहे. ते म्हारळ येथे राहतात. उल्हासनगर महापालिका सर्वोपचारी रुग्णालयाचे व्यवस्थापक सुनील कनोजिया यांनी याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
पोलीस ठाण्यातील तक्रारीत व्यवस्थापक कनोजिया यांनी म्हटले आहे, की उल्हासनगर महापालिका सर्वोपचारी रुग्णालयात रुग्णालयातील स्वयंपाक घरातील खानसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची शुक्रवारी दुपारी एक बैठक होती. या बैठकीनंतर प्रतिबंध असलेल्या रुग्णालयातील दालनात स्वयंपाक घर देखरेख प्रमुख कल्पेश कोर, मनुष्यबळ विभागाचे कर्मचारी भाग्यश्री दसारी, दीपाली निकम, मोनाली धवलकर, प्रकल्प प्रमुख रेश्मा पाताडे उपस्थित होते. त्यावेळी दालनात रुग्णालय कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास प्रतिबंध असताना म्हारळ येथील रहिवासी अनिल पाटील हे त्या दालनात परवानगी न घेता घुसले. त्यांनी दालनातील उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. आम्हाला शिवीगाळ का करता, असा प्रश्न कल्पेश कोर यांनी अनिल पाटील यांना केला. त्यावेळी संतप्त झालेल्या अनिल यांनी रागाच्या भरात कल्पेश कोर यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. घडल्या प्रकाराबद्दल रुग्णालयात घबराटीचे वातावरण पसरले.
रुग्णालय प्रमुख डाॅ. संजित पाॅल, रेश्मा पाताडे यांच्याशी चर्चा करून व्यवस्थापक सुनील कनोजिया यांनी या मारहाण प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.