लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: घोडबंदर येथील एका खासगी बँकेतील कर्मचाऱ्याच्या डोळ्यादेखत एका भामट्याने हातचालाखीने २४ हजार रुपये लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपाचा पोलीस शोध घेत आहेत.
घोडबंदर येथील वाघबीळ भागात खासगी बँकेचे कार्यालय आहे.

१४ ऑगस्टला या बँकेमध्ये एक व्यक्ती आला होता. त्याने बँकेतील रोखपालकडे (कॅशियर) सुट्या रुपयांच्या मोबदल्यात ५०० रुपयांची नोट मागितली. त्यानुसार, महिला कर्मचारीने त्याला ५०० रुपयांची नोट देण्यासाठी ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल काढले. कर्मचारीने त्याला बंडलमधील एक नोट काढून दिली असता, त्याने मला माझ्या पसंतीच्या क्रमांकाची नोट हवी आहे, अशी मागणी केली. त्यामुळे कर्मचारीने हातातील ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल त्याला दिले. त्याने बंडलमधील नोटा पसरविल्या. त्यातील एक नोट हातात घेऊन इतर नोटा पुन्हा कर्मचारीकडे दिल्या आणि तो निघून गेला. त्यानंतर कर्मचारीने नोटा मोजल्या असता, त्यामध्ये ५०० रुपयांच्या ४८ नोटा गायब असल्याचे आढळून आले.

हेही वाचा… डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात रिक्षांमध्ये मद्याचा अड्डा

कर्मचारीने याबाबत व्यवस्थापकाकडे याची तक्रार केली. व्यवस्थापकांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असता, तो व्यक्तीने हाचलाखीने नोटा खिशामध्ये भरत असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर संबंधित कर्मचारीने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader