ठाणे खाडी परिसर फ्लेमिंगोंसह सुमारे २०० स्थलांतरित पाणपक्ष्यांचे हे माहेरघर आहे. फ्लेमिंगोसाठी ठाणे खाडीत मोठ्याप्रमाणात खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने फ्लेमिंगोची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असून सध्या ७० हजार ते १ लाख फ्लेमिंगो आहेत. ग्रेटर फ्लेमिंगोपेक्षा लेसर फ्लेमिंगोच्या संख्येत मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याची नोंद बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)द्वारे करण्यात आली आहे.
हेही वाचा- मुंबई: रखडलेल्या झोपु योजनांतील वित्तीय संस्था यापुढे संयुक्त विकासक
मुंबई महानगरातील वाढत्या सिमेंट-कॉंक्रीटच्या जंगलात आणि प्लास्टिकच्या कचऱ्यात जैवविविधता तग धरून आहे. तसेच, वाढत्या विकासात्मक कामांमुळे अन्नसाखळी विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे खाडीच्या १७ चौ. किमी. क्षेत्रात विविध वनस्पती, पशुपक्षी दिसतात. या भागाला ”फ्लेमिंगो अभयारण्य” घोषित करण्यात आले असून नुकताच रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे, दिवसेंदिवस या भागातील जैवविविधता वाढवण्यावर आणि त्यांचा अभ्यास करण्यावर भर दिली जात असल्याची माहिती बीएनएचएसकडून देण्यात आली.
देशात राज्यासह राजस्थान, तमिळनाडू, गुजरात या भागात फ्लेमिंगो मोठ्या संख्येने दिसून येतात. मात्र, राज्यात ठाणे खाडी परिसरात फ्लेमिंगोच्या संख्येचा आलेख वाढता आहे. १९९१-९२ या साली ८ ते १० हजार फ्लेमिंगोची संख्या होती. २०१८ साली ही संख्या ४० हजारांवर पोहचली. आता ७० हजार ते १ लाखापर्यंत फ्लेमिंगोची संख्या वाढली आहे. फ्लेमिंगोला इतर ठिकाणापेक्षा ठाणे खाडी परिसरात खाद्यपदार्थ मुबलक प्रमाणात मिळत असतील किंवा इतर भागात विकासात्मक कामे सुरू असावी, त्यामुळे तेथील अधिवास कमी झाला असण्याची शक्यता बीएनएचएसमधील अभ्यासकांनी वर्तवली आहे.
हेही वाचा- मुंबई: पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या जागेचा अखेर ई लिलाव
बीएनएचएसद्वारे २०१७ पासून ठाणे खाडीला भेट देणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण करत आहे. हिवाळ्यातील पक्ष्यांची निवासस्थाने आणि स्थलांतराचे स्वरूप समजून घेण्यासाठी रिंग, रंगीत फ्लॅग लावण्यास सुरुवात केली. आतापर्यंत सुमारे २१ हजार पक्ष्यांना रिंग, फ्लॅग लावण्यात आले आहेत. तर, १५० फ्लेमिंगोला रिंग, रंगीत फ्लॅग लावण्यात आले आहेत. फ्लेमिंगोंचा मार्गक्रमण अहवाल मिळण्यासाठी जानेवारी ते एप्रिल २०२२ या कालावधीत तीन मोठ्या आणि तीन लहान अशा एकूण सहा फ्लेमिंगोना सॅटेलाईट ट्रान्समीटर टॅगिंग करण्यात आले. हे फ्लेमिंगो सध्या गुजरातमध्ये असल्याची नोंद आहे, अशी माहिती बीएनएचएसचे उपसंचालक राहुल खोत यांनी दिली.
हेही वाचा- ‘मेट्रो ९’ मार्गिकेची धाव आता उत्तनपर्यंत
बीएनएचएसद्वारे देशात सर्वात प्रथम १९२७ मध्ये पक्ष्यांना रिंग टॅगिंग करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या पद्धतीचा वापर वाढून विविध प्रजातीच्या पक्ष्यांना रिंग, रंगीत फ्लॅग टॅगिंग करण्यात आले. त्यामुळे पक्ष्यांची नोंद ठेवण्यास सोयीस्कर होऊ लागले. आतापर्यंत देशभरातील १०५ हून अधिक प्रजातींच्या सुमारे ७ लाखांहून अधिक पक्ष्यांना रिंग आणि फ्लॅग टॅगिंग करण्यात आले आहे. बीएनएचएसने १९९३-९४ या वर्षात सॅटेलाईट टॅगिंग करण्यास सुरुवात केली. देशभरात आतापर्यंत १६ प्रजातींच्या १७३ पक्ष्यांना सॅटेलाईट टॅगिंग करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.