लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याणमधील आधारवाडी येथील तुरूंगात दोन कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. या वादामध्ये अन्य एका कैद्याने मध्यस्थी केली. आमच्यामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून एका कैद्याने मध्यस्थी केलेल्या कैद्यावर गुरुवारी दुपारी आधारवाडी तुरुंगात धारदार पातेने हल्ला करून त्याला जखमी केले. या प्रकाराने काही वेळ तुरूंगात खळबळ उडाली.

युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार असे कैद्याचे नाव आहे. तो आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहे. महिला तुरूंग अधिकारी शोभा मधुकर बाविस्कर यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

आणखी वाचा-कल्याण रेतीबंदरमध्ये बेकायदा इमारतीमधील घरांची विक्रीकरून १० जणांची फसवणूक

पोलिसांनी सांगितले, आधारवाडी कारागृहात सर्कल क्रमांक पाचच्या समोर युवराज नवनाथ पवार आणि रोशन घोरपडे या दोन कैद्यांमध्ये वादावादी होऊन हाणामारी झाली होती. या वादामध्ये अरविंद उर्फ मारी रवींद्र राम या कैद्याने मध्यस्थी करून घोरपडे आणि पवार यांच्यामधील वाद मिटवला होता. हा वाद का मिटवला आणि तू मध्ये का पडला, असा प्रश्न युवराजने अरविंदला केला होता. तो राग युवराजच्या मनात होता.

गुरुवारी संध्याकाळी युवराज आणि अरविंद कारागृहात समोरासमोर आल्यावर युवराजने दात घासायच्या ब्रशमध्ये धारदार पातेचे तुकडे अडकविले होते. या पातेने युवराजने अरविंदच्या कान, चेहऱ्यावर, डोक्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात अरविंद जखमी झाला. तात्काळ तुरुंग कर्मचाऱ्यांनी धावपळ करून दोघांना दूर केले. अरविंदवर धारदार पातेने हल्ला केला, तुरूंगाची शिस्त बिघडवली म्हणून तुरुंग अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Story img Loader