वस्तू व सेवा कर विभागाच्या पोर्टलवरील कल्याण मधील एका व्यावसायिकाच्या ईमेल आयडी मध्ये एका अज्ञात व्यावसायिकाने परस्पर फेरफार केले. या फेरफारच्या माध्यमातून मूळ व्यावसायिकाच्या नावाने सुमारे पाचशे कोटींची आर्थिक उलाढाल अज्ञात व्यावसायिकाने करून वस्तू व सेवा कर विभागाचा 90 कोटीचा जीएसटी बुडविला असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
कल्याण मधील मूळ व्यावसायिकाच्या हा बेनामी प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली आहे. पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत किशन चेतन पोपट हे व्यवसायिक राहतात. त्यांची श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट फर्म आहे. ते एंजल ब्रोकिंग या कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन डिमॅट खाते उघडण्याचा व्यवसाय करतात. किशन यांनी संगणक प्रणालीवर व्यवसायाकरिता जीएसटी क्रमांक 27EZ4PP1327Q1ZC काढला आहे. या क्रमांकाच्या जुळीणीसाठी आपला मोबाईल क्रमांक जुळणीला जोडला आहे.
एका अनोळखी व्यावसायिकाने किशन पोपट यांच्या जीएसटी पोर्टल वरील संगणक प्रणालीमध्ये परस्पर फेरफार केले. पोपट यांचे फर्म प्लास्टिक पिशवी खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे दाखविले. पोपट यांच्या जीएसटी पोर्टलला अज्ञात व्यावसायिकाने स्वतःचा फेरफार केलेला ईमेल आयडी जोडला. त्यानंतर अज्ञात व्यावसायिकाने किशन पोपट यांच्या फर्मच्या जीएसटी क्रमांकावरुन किशन यांना काहीही कळू न देता श्रीकृष्ण इन्व्हेस्टमेंट या नावे नोव्हेंबर २०२० पासून २५ जून २०२१ पर्यंत ५०२ कोटी ४२ लाख ७८ हजार ८५६ आर्थिक व्यवहार केले.
या व्यवहारामध्ये अज्ञात व्यावसायिकाने ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांचा जीएसटी कर न भरता राज्य शासन व मूळ व्यवसायिक किशन पोपट यांची आर्थिक फसवणूक केली आहे. वस्तू व सेवा कर विभागाकडून किशन यांना जीएसटी रकमेबाबत विचारणा झाल्यानंतर हा फसवणुकीचा प्रकार उघडकीला आला आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये मध्ये अज्ञात व्यावसायिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक चंद्रकांत काटकर याबाबत अधिक तपास करीत आहेत.