ठाणे  येथे असलेल्या महाविद्यालयातील १६ वर्षीय विद्यार्थ्याला एका अज्ञात व्यक्तीने कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल आणि काही पैसे लुटल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा १६ वर्षीय मुलगा वागळे इस्टेट भागातील किसन नगर परिसरात राहतो. तो तीन हात नाका जवळील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. नेहमीप्रमाणे तो दुपारी १२ वाजताच्या दरम्यान आपल्या मित्रासह महाविद्यालयात जाण्यास निघाला. ते दोघे महाविद्यालयाजवळ पोहोचल्यानंतर दुसऱ्या मित्राची वाट पाहण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले. त्या दरम्यान, त्यांच्या जवळ एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरुन आला. त्या व्यक्तीने त्यांच्याकडे मोबाईल मागितला.

त्या विद्यार्थ्यांनी त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्यांना त्याच्या दुचाकीजवळ बोलावून त्याच्या गाडीत असलेला कोयता काढून त्यांना धमकाविले. ‘मी आताच जेलमधून सुटून आलो असून तुम्ही मला मोबाईल का देत नाहीत, थांबा तुम्हाला कोयत्याने मारुन मी पुन्हा जेल मध्ये जातो अशा शब्दात त्या विद्यार्थ्यांना अज्ञात व्यक्तीने धमकावले. त्यावेळी त्याने किसननगर भागातील त्या विद्यार्थ्याचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्याला माझ्या सोबत चल तुला मी पुढे गेल्यावर मोबाईल परत करतो असे सांगितले. जबरदस्ती त्या विद्यार्थ्याला त्याने त्याच्या दुचाकीवर मागे बसण्यास सांगितले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा पासून काही अंतरावर जाऊन त्याने गाडी थांबविली. त्यावेळी त्या विद्यार्थ्याचे दोन्ही मित्र त्याच्यामागे धावत आले. त्यावेळी त्या अज्ञात व्यक्तीने पुन्हा कोयता काढून त्यांना मारण्याची धमकी देत, त्याच्यासोबत गाडीवर असलेल्या विद्यार्थ्याचे दप्तर हिसकावून त्यातील ३०० रुपये काढले त्यानंतर, त्या विद्यार्थ्याला गाडीवरुन उतरण्यास सांगितले आणि माझ्या मागे येवू नकोस अशी त्या विद्यार्थ्याला धमकी देत त्याने तेथून पळ काढला.