ठाणे : अनधिकृत बांधकामांसाठी वसूली कोण करणार, साहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले. मुंब्रा येथील काही भागात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू आहे. महापालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडावे, तेथील बांधकामाची पाहाणी करावी. महापालिकेचे अधिकाऱ्यांमध्ये वसूलीसाठी स्पर्धा लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ‘ओएसडी’ नेमताना साफ-सफाई केली. त्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी नेमतानाही साफ-सफाई करावी अशी मागणी देखील परांजपे यांनी केली. तसेच ठाण्यातील वस्तूस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडणार असल्याचेही परांजपे म्हणाले.

मुंब्य्रातील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी वसुली करण्यासाठी एक टोळी गेली होती. त्यांना तेथून पळवून लावण्यात आले. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेतून सेवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या मार्फत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांकडून वसूली केली जात होती. परंतु आता त्याच्या जागेवर कोण वसूली करणार यावरुन आता महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचा आरोप परांजपे यांनी केला. महापालिकेचे अनेक अधिकारी अनेक वर्षे एकाच खात्यात अधिकारी राहत असून त्यांच्या बदल्या का केल्या जात नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामे होत आहेत. महापालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडून प्रत्यक्ष पाहाणी करावी असेही ते म्हणाले. येत्या आठवड्यात या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना या बाबतीत वस्तूस्थिती सांगितली जाणार असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ‘ओएसडी’ नेमताना साफ-सफाई केली. त्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी नेमतानाही साफ-सफाई करा अशी मागणी देखील परांजपे यांनी केली.

Story img Loader