ठाणे : शहराचा प्राणवायु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, या जंगलात पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची परवानगी नसतानाही बंगले उभारणीचा प्रकल्पाचे काम सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेले ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांचा हा प्रकल्प असून या प्रकल्पातील बंगले वाचविण्यासाठीच त्यांनी हा पक्षप्रवेश केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे.
हेही वाचा >>> डोंबिवली : शिळफाटा रस्ते बाधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
ठाणे येथील येऊरचा परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येतो. घनदाट जंगल असलेला हा भाग शहराचा प्राणवायु म्हणून ओळखला जातो. हा परिसर पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची मान्यतेशिवाय बांधकामे करता येत नाही. असे असले तरी ठाणे शहरातील विविध भागांबरोबरच येऊरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली असून आजही याठिकाणी बेकायदा बांधकामे उभारणीची कामे सुरु आहेत. या भागात पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या मान्यतेशिवाय बंगले प्रकल्प उभारणीचे काम सुरु असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. याबाबत कोकण आयुक्तांनी या बांधकामांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडला होता. असे असतानाच राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी बंगले प्रकल्पाबाबत गौप्यस्फोट करत गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> टिटवाळ्यात बेकायदा चाळींवर कारवाई, रस्त्यावरील निवारे जमीनदोस्त
येऊर परिसरात ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांचा २४ बंगले उभारणीचा प्रकल्प सुरु असून या प्रकल्पाला पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची मान्यता मिळालेली नाही. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र समितीची बैठक होणार असून त्या बैठकीच्या पटलावर जगदाळे यांच्या बंगल्यांच्या मंजुरीचा विषय आहे. त्यामुळे लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर भागाच्या विकासासाठीच बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याचे जगदाळे हे सांगत असले तरी ऊरचे बंगले वाचविण्यासाठीच त्यांनी पक्ष प्रवेश केल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर भागाच्या विकासासाठी की स्वयंहितासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे, हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र समितीच्या बैठकीनंतर स्पष्ट होईलच, असा दावाही त्यांनी केला आहे.
म्हणूनच ते पक्ष सोडून गेले
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी क्लस्टर योजना लागू व्हावी यासाठी सर्वप्रथम आंदोलन केले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात योजनेला मंजुरी झाली. त्यानंतर त्या योजनेची नियमावली करण्याचे काम झाले. क्लस्टर योजनाही शासनाने लागू केलेली आहे. एखादी योजना शासनाने जाहीर केल्यानंतर प्रभागांमध्ये कोणत्या पक्षाचा आहे, हे बघितले जात नाही किंवा त्यावर ती योजनाही ठरत नाही. त्यामुळे क्लस्टर योजनेसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याचे जगदाळे यांनी सांगितले असले तरी ते एक बांधकाम व्यावसायिक असल्याने प्रभागाचा विकासासाठी कि स्वयं हितासाठी गेले, हेही लवकरच समजेल, असेही परांजपे म्हणाले. राष्ट्रवादीचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी जगदाळे यांना महत्वाची पदे, प्रेम आणि आपुलकी दिली पण, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मिळणाऱ्या गोष्टी महत्वाच्या वाटल्या असतील म्हणूनच ते पक्ष सोडून गेले, असा टोलाही त्यांनी लगावला. या भागात पक्षाची ताकद असल्याचा दावाही त्यांनी केला.