ठाणे : ठाणे शहरातील कचरा उचलला जात नाही. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा कचरा जमा झाला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील तीन ते चार दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर, ठाण्यातील कचरा महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नेऊन टाकू असा इशारा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला. महायुती आणि सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोणी खेळणार असेल तर कदापी गप्प बसणार नाही असाही इशारा त्यांनी दिली.

ठाणे महापालिकेला स्वत:ची कचरा भूमी नाही. वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात ठाणे महापालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. याठिकाणी कचऱ्याचे ढीग लागल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. त्यामुळे येथील नागरिकांचा त्यास विरोध आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या भागातील कचऱ्याच्या गाड्या फोडू असा इशारा दिल्यानंतर आता शहरातील कचरा महापालिकेकडून पूर्णपणे उचलला जात नाही. या प्रश्नाविषयी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी परांजपे यांनी गंभीर आरोप केले.

मागील तीन ते चार दिवसांपासून ठाणे शहरातील कचरा उचलला जात नाही. शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. तीन वर्ष महासभा नसल्याने आयुक्तांकडे सर्वाधिकार आहे. कचऱ्याच्या या समस्येस महापालिका जबाबदार आहे असे परांजपे म्हणाले. करोनामध्ये ३२ कोटी रुपये खर्च करून युरोपहून कचरा उचलण्यासाठी यंत्रणा आली होती. आता देखील सुमारे २५०० कोटी रुपयांचा ठेका शास्रोक्त पद्धतीने घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी काढण्यात आला आहे. त्या निवेदीची कालबाह्यता संपल्यानंतरही ते उघड केले जात नाही. मुंबईमध्ये एका ठेकेदाराचा १४०० कोटी रुपयांचा ठेका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्यानंतर त्या ठेकेदाराला ठाण्यात सामावेश करण्यासाठी हा ठेका उघड केला जात नाही का असा प्रश्न देखील आनंद परांजपे यांनी केला.

ठाणे शहरातील कचरा उचलला जात नाही. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हा कचारा जमा झाला आहे. ठाणेकरांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील तीन ते चार दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर, ठाण्यातील कचरा महापालिकेच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर नेऊन टाकणार आहोत. महापालिका अधिकाऱ्यांची मुजोरी वाढली आहे असेही ते म्हणाले. महायुतीत आणि सत्तेत असलो तरी ठाणेकरांच्या जीवाशी कोणी खेळणार असेल तर आम्ही कदापी गप्प बसणार नाही असाही इशारा त्यांनी दिली.