जिल्हाध्यक्ष पदावरून आंनद परांजपे यांना काढून त्यांच्या जागी सुहास देसाई यांची नियुक्ती
ठाणे : राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ आनंद परांजपे यांना ठाणे शहर जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई यांची तर कार्याध्यक्ष पदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची रविवारी शपथ घेतली. यामुळे शिवसेनापाठोपाठ वर्षभराने राष्ट्रवादीतही फुट पडल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील वेगवेगळ्या भागातील लोकप्रतिनिधी तसेच पक्ष पदाधिकाऱ्यांकडून त्यांना समर्थन देण्यास सुरुवात केली असतानाच, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनीही अजित पवार यांना समर्थन दिले आहे. या वृत्तास त्यांनी दुजोरा देत अजित पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीत फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय म्हणून परांजपे ओळखले जातात. त्यामुळे हा आव्हाड यांच्यासाठीही धक्का मानला जात आहे.
हेही वाचा >>>कल्याण जवळील मोहने येथील स्मशानभूमी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल
पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवार यांना साथ देणाऱ्या परांजपे यांना आता ठाणे जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या जागी ज्येष्ठ माजी नगरसेवक सुहास देसाई यांची तर कार्याध्यक्ष पदी प्रकाश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर केली आहे.