ठाणे : कळवा येथील कावेरी सेतू लगत असलेल्या शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाट बंधारे विभाग तसेच रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावर स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे बेकायदेशीररीत्या कार्यालय थाटण्यात आले आहे, असा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. या बांधकामावर कारवाई करून जागा ताब्यात घेण्याबरोबरच बांधकामप्रकरणी एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कळवा परीसरातील सर्वे नं. १११/२/क, १११/३/४, १११/१/अ, १११/३/१, १११/२/ब, १११/२/ड, १११/१/ब, ही जागा कावेरी सेतू लगत आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारे खाते आणि मध्य रेल्वे कारशेडची असल्याचे उपलब्ध माहितीवरुन दिसून येते. परंतु या जागेमध्ये संबंधित विभागांकडील कोणत्याही परवानगीविना स्थानिक आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत राष्ट्रवादी (शरद पवार) या राजकीय पक्षाचे बेकायदेशीररीत्या कार्यालय थाटण्यात आले आहे, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. या जागेचा वापर विविध राजकीय कार्यक्रम, राजकीय सभा, बैठका यासाठी केला जातो.

कोणतीही पूर्व परवानगीविना नियमबाह्यपद्धतीने या ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यालय उभे करुन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, पाटबंधारे खाते आणि मध्य रेल्वे कारशेडच्या भूखंडावर सर्रासपणे अतिक्रमण करण्यात आले आहे. या कार्यालयाला ठाणे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून अनधिकृतरीत्या पाणी जोडणी देखील करण्यात आली असल्याची समजते. तसेच या कार्यालयाला मालमत्ता कर आकारणी झाली आहे का ? हा देखिल प्रश्न आहे, असे परांजपे यांनी म्हटले आहे. बेकायदेशीररीत्या थाटण्यात आलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर तातडीने कारवाई करावी. तसेच हे कार्यालय उभारणाऱ्यांवर तातडीने एम.आर.टी.पी. अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परांजपे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Story img Loader