ठाणे : शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सुमारे १६०० कोटी रुपये खर्चून आनंदनगर ते साकेत असा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गालगत या मार्गिकेची उभारणी करण्याचे नियोजन आहे. परंतु या मार्गावर असलेल्या उड्डाण पुलांचा उन्नत मार्गिकेच्या उभारणीत मोठा अडथळा असून यामुळे या मार्गाच्या उभारणीपुढे समस्यांचा मोठा डोंगर उभा राहिला आहे, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली.
ठाणे शहरातून मुंबई-नाशिक महामार्ग तर, घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या दोन्ही महामार्गांवरून रात्री आणि पहाटेच्या वेळेत अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. मुंबई, नाशिक, भिवंडी, गुजरात आणि जेएनपीटी बंदराच्या दिशेने ही वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्याही मोठी आहे. हे दोन्ही रस्ते शहरातील अंतर्गत मार्गांना जोडण्यात आलेले असून शहरातील वाहतुकीसाठीही हे रस्ते महत्त्वाचे मानले जातात. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत नोकरदार वर्गाची वाहनांची वाहतूक सुरू असते. या वाहनांची संख्या मोठी आहे. सततच्या वर्दळीमुळे या मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू असून यामुळे रस्ते अरुंद झाल्याने कोंडीत भर पडते. ही समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून नवीन रस्ते उभारणीचे नियोजन आखण्यात आलेले असून त्यामध्ये आनंदनगर ते साकेत असा उन्नत मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे. या मार्गिकेच्या उभारणीसाठी सुमारे १६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई-नाशिक महामार्गालगतच ही मार्गिका उभारणीचे नियोजन आहे.
हेही वाचा – ठाणे : विहिरीत पडलेल्या श्वानाची सुखरूप सुटका
मुंबई-नाशिक महामार्गावर तीन हात नाका, नितीन कंपनी ते कॅडबरी आणि माजिवाडा भागात उड्डाण पूल आहेत. आनंदनगर ते साकेत या उन्नत मार्गिकेच्या उभारणीत तीन हात नाका, नितीन कंपनी ते कॅडबरी या पुलांचा फारसा अडथळा येणार नाही. परंतु माजिवाडा चौकातील उड्डाण पुलांना भेदून ही मार्गिका नेण्याचे मोठे आव्हान प्राधिकरणापुढे असून येथील उड्डाण पुलांचे जाळे आणि त्यात मेट्रोची मार्गिकेचा पूल याचा मोठा अडथळा मार्गिकेच्या उभारणीत आहे. शिवाय, मेट्रो कामामुळे नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. ही कामे पूर्ण होत नाही तोच या मार्गिकेचे काम सुरू झाले तर नागरिकांना आणखी काही वर्षे कोंडीचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे प्राधिकरणाने या प्रकल्पाचे पुनर्विलोकन करण्याचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
काय आहे प्रकल्प?
आनंदनगर ते साकेत असा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ६.३ कि.मी लांबी आणि २८ मीटर रुंदीचा हा पूल असणार आहे. या पुलावर दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत.