रोजच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन नृत्य, हास्य, योग करुन आपले मन मोकळे करावे. प्रत्येकाला सुखाने, आनंदाने जगण्याचा लाभ घेता यावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सोदामिनी आणि रोटरी क्लब ऑफ रिजन्सी आणि रोटरी क्लबतर्फे डोंबिवली पूर्व भागातील फडके रस्त्यावरील आप्पा दातार चौकात रविवारी सकाळी रस्ता आनंदोत्सव (हॅप्पी स्ट्रीट) कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हेही वाचा- मुंबईत कामे झालेली नसल्याबाबत जनता त्यांना हिशोब विचारेल; मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांचे विधान
रोटरी क्लबचे सदस्य, शहरातील तरुण, तरुणी, ज्येष्ठ, वृध्द मंडळी सकाळच्या कुडकुडणाऱ्या थंडीवर मात करत या उपक्रमात सहभागी झाली होती. कार्यालयांना सुट्टी असल्याने नोकरदार वर्ग या उपक्रमात सहभागी झाला होता. व्यासपीठावरील झुम्बा नृत्याला प्रतिसाद देत रस्त्यावरील आनंदोत्सवात सहभागी झालेली मंडळी व्यासपीठावरील तालावर ठेका धरत नृत्य करत होती. झुम्बा नृत्याच्या ठेक्यावर मदन ठाकरे चौकातील सहभागी प्रत्येकाने ठेका धरला होता. जादुचे खेळ, योग, विविध प्रकारची आसने रस्त्यावर केली जात होती. करो ओके, बसल्या जागी चित्र काढून रंगविणे या प्रत्येक उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता.
सकाळच्या प्रहारी रविवारी सकाळी फडके रस्ता मौज, मजा, धम्माल यांनी न्हाऊन निघाला होता. आताच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला समस्या, चिंता, दुख येते. या सगळ्या चिंतेमधून प्रत्येकाने मुक्त होऊन जगण्याचा आनंद लुटावा. वाट्याला आलेले जगण्याचे क्षण आनंदाने जगावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता, असे आयोजकांनी सांगितले.