आज आधुनिकतेकडे झेपावणाऱ्या ठाण्यात हजार-बाराशे वर्षांपूर्वीची सुंदर नक्षीकामाने मंडित असलेली प्राचीन मंदिरे नाहीत. मंदिर हा समाजाचा आरसा आहे, भक्तिभावाने प्रेरित शुद्ध धर्माचरण, अध्यात्म, कला, सौंदर्य व वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे. आज तलाव, विहीर वा उत्खननात अवशेषरूपाने सापडत असलेले कोरीव स्तंभ, छत तोलून धरणारे कीचक, विविध देवदेवतांच्या मूर्ती, वीरगळ, शिलालेख, ताम्रपट पाहताना या प्राचीन वैभवाची कल्पना येते. ठाण्यात सापडलेल्या मूर्ती, शिलालेख, ताम्रपट, प्राचीन वस्तूंचे जतन-संवर्धन करण्यासाठी ठाण्यात पुरातन वस्तुसंग्रहालय नाही. त्यामुळे ठाण्यात सापडलेल्या अनेक दुर्मीळ मूर्ती पुरातत्त्व विभाग व छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई अथवा इतरत्र गेल्या आहेत. १८८१ साली नगरपालिकेने मासुंदा तलावातील गाळ-कचरा काढला, त्या वेळी असंख्य देवदेवतांच्या भग्न मूर्ती सापडल्या होत्या. अलीकडे जेव्हा तलाव उपसला तेव्हा गणपतीची सुरेख पाषाणमूर्ती सापडली. १९६० साली जोंधळी बागेतील उत्खनात श्रीगणेश, विष्णू (श्रीधराची मूर्ती), वराह, महिषासुरमर्दिनी इत्यादी देवदेवता सापडल्या. ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या आवारातही १९६४ साली सरस्वती व मारुतीच्या मूर्तीबरोबर इतर अनेक वस्तू सापडल्या. मासुंदा तलावात सापडलेली गणपतीची एक मूर्ती सध्या प्राच्य विद्या अभ्यासिकेत ठेवली आहे. घोडबंदर रस्त्याच्या रुंदीकरणात एक शिर नसलेली, पण वस्त्रालंकाराने नटलेली देवीची सुंदर मूर्ती सापडली, तीसुद्धा प्राच्य विद्या अभ्यासिकेत ठेवली आहे.
लालबहादूर शास्त्री मार्गावरील जोंधळी बागेत सापडलेली श्रीगणेश मूर्ती व श्रीधराची मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ठेवली आहे. शिलाहारांची राजधानी श्रीस्थानक हे नाव बहुधा श्रीगणेशावरून पडले असावे. ही गणेशमूर्ती तुंदिलतनू असून गणेशाची सर्व शास्त्रीय लक्षणे बघावयास मिळतात. गणेशाच्या तीन हातांत अनुक्रमे स्वत:चा तुटलेला दात, मोदकपात्र व कमळाची कळी आहे. या मूर्तीचा वरचा उजवा हात तुटलेला आहे. गणेशाने नागाचा कंबरपट्टा बांधलेला असून त्याची गाठ समोरच्या बाजूस दिसते. गणेशाचे वाहन असलेल्या मूषकास बैठकीवर ठळक स्थान दिले आहे. गणेशाला हत्तीचे डोळे कसे प्राप्त झाले यासंबंधी पुढील आख्यायिका विशेष लोकप्रिय आहे.
शिवाची अर्धागिनी पार्वती तपश्चर्येनंतर स्नानास बसते. स्वत:च्या शरीरावरील मळ व तेलाच्या मिश्रणातून ती स्वत:च्या मुलास घडवून त्यास पहाऱ्यावर बसविते. तिचे स्नान सुरू असतानाच शिव परततो. पण पहाऱ्यावर असलेला बालक त्यास थांबवितो! यामुळे क्रोधित होऊन शिव त्या बालकाचा शिरच्छेद करतो. या घटनेने पार्वती अतिशय कृद्ध होते आणि शक्तीचे रूप धारण करून तिन्ही लोकांचा नाश करण्याचा पण करते. तिला शांत करण्यासाठी शिव आपल्या गणांना उत्तर दिशेने (उत्तर दिशा ही बुद्धीशी संबंधित समजली जाते) जाऊन जो प्राणी त्यांना सर्वप्रथम दिसेल त्याचे शिर घेऊन येण्याची आज्ञा देतो. सर्वप्रथम/ शिवगणांना एक हत्ती दिसतो. ते त्याचे शिर घेऊन येतात.
ओवळ्याची शेषशायी विष्णूची मूर्ती अतिशय भव्य असून विष्णू डावा पाय दुमडून शेषावर पहुडला असून लक्ष्मी त्याचा उजवा पाय मांडीवर घेऊन पादसंवाहन करते आहे. विष्णूच्या बेंबीतून कमलपुष्प उमलले असून त्यात ब्रह्मदेव बसले आहेत. शेषशायी मूर्ती ७ फूट लांब, ३ फूट रुंद व ४ फूट उंच आहे. विष्णूच्या मस्तकावर शेषाने फणा काढून सावली धरली आहे. विष्णूच्या मस्तकावरील मुकुट, अंगावरील कर्णभूषणादी अलंकार व पितांबर वस्त्र स्पष्ट दिसेल असे कोरलेले आहे. लक्ष्मी ही सर्व साजशृंगारासह दाखविली आहे. ही मूर्ती यादवकालीन १३व्या शतकातील असून येथे यादवांचा ताम्रपटही सापडला आहे. खोपट येथील सिद्धेश्वर तलावाकाठी उत्खननात सापडलेल्या ब्रह्माच्या मूर्तीचे हात खंडित झाले असले तरी महाराष्ट्रात सर्वात परिपूर्ण ब्रह्ममूर्ती ओळखली जाते. ९व्या शतकातील या मूर्तीला पुढील बाजूस तीन व मागे एक अशी चार मस्तके असून, स्वत:च निर्माण केलेल्या सृष्टीकडे ब्रह्मा मोठय़ा कौतुकाने पाहत उभा आहे. २०१० साली गोकुळनगरजवळील गोल्डन डाय कंपनीच्या मागील आवारात शिवाची त्रिमुखी मूर्ती सापडली. प्रथमदर्शनी घारापुरीच्या त्रिमूर्तीच्या लहान प्रतिकृतीचा भास होतो, पण ही त्रिमूर्ती सर्वस्वी वेगळी आहे. ही मूर्ती माझे मित्र एकनाथ पवळे यांच्या पाहण्यात प्रथम आली. त्यांनी ताबडतोब फोन करून तिथे बोलावून घेतले. मूर्तीचे फोटो काढून ठाण्यातील प्राच्य विद्या अभ्यासक डॉ. दाऊद दळवी यांना दाखवले. ही मूर्ती कुणा चोराचिलटांच्या हाती लागण्यापूर्वी सुरक्षित जागी हलवली पाहिजे, असे ठरवून ठाण्याचे तेव्हाचे महापौर अशोक वैती यांच्या कानावर घातले. दुसऱ्या दिवशी महापौरांनी ती मूर्ती कापुरबावडीच्या कलादालनात नेऊन ठेवली. आज ती तिथे सुरक्षित असली तरी ठाणे जिल्ह्य़ाचे वस्तुसंग्रहालय नाही, ही खंत आहे.
सदाशिव टेटविलकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा