आसनगावहून मुंबईच्या दिशेने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जाणाऱ्या एका लोकलला पाऊण तास विलंब झाल्याने संतप्त प्रवाशांनी शनिवारी आसनगाव स्थानकात रेलरोको आंदोलन केले. प्रवाशांनी केलेल्या या आंदोलनामुळे सकाळच्या वेळेत मध्यरेल्वेचे वेळापत्रक काही काळ कोलमडले होते. तर मध्य रेल्वेच्या नियमित विलंबसत्रामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांनी मोठया आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांची संख्या इतर मार्गावरील गाड्यांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे एकही उपनगरीय गाडी विलंबाने धावल्यास अथवा अचानक रद्द केल्यास या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. तसेच ओव्हरहेड वायर तुटणे, सिग्नल निकामी होणे, मालगाडीचे अथवा एक्प्रेस गाड्यांचे इंजिन बंद पडणे यांसारख्या अनेक कारणांमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दररोज त्रास सहन करावा लागतो. मध्यरेल्वेच्या या विलंब सत्रामुळे हैराण झालेल्या प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक शनिवारी आसनगाव स्थानकात पाहायला मिळाला.
सकाळच्या वेळेत आसनगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी ७ वाजून ५९ ची लोकल शनिवारी तब्बल पाऊण तास उशिराने धावत होती. या लोकलनंतर आसनगावहून साठे आठ वाजता सुटणाऱ्या लोकलची घोषणा झाली. आधीची लोकल पाऊण तास उशिराने धावत असल्याच्या जाब विचारण्यासाठी संतप्त प्रवाशांनी साडे आठची लोकल गाडी रुळांवर उतरत रोखून धरली. प्रवाशांनी अचानक घेतलेल्या या पावित्र्यामुळे स्थानक प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली होती. यानंतर स्थानक प्रशासनाने प्रवाशांनी संवाद साधल्याने प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले. मात्र यात बराच वेळ गेल्याने सकाळी कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उपनगरीय गाड्यांची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने झाली. तर शुक्रवारी रात्री वासिंद – आसनगाव स्थानका दरम्यान रात्री साडे दहाच्या सुमारास मालगाडीचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वासिंद येथून अन्य इंजिन उपलब्ध केल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. यामुळे मालागडीच्या पाठीमागे असलेल्या दोन कसारा लोकल तसेच लांबपल्ल्याच्या हावडा एक्सप्रेस, शिर्डी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस, वाराणसी एक्सप्रेस या गाड्या तब्बल दोन तास उशिराने धावत होत्या. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा संतप्त प्रवाशांकडून दिला जात आहे
महिन्याभरात तीन वेळेस रेलरोको
याआधी प्रवाशांनी १६ नोव्हेंबरला लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टिटवाळा स्थानकात, ३० नोव्हेंबरला सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं वासिंद स्थानकात आणि शनिवारी लोकल उशिराने धावल्याने आसनगाव स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.