ठाणे : येऊर येथील एका पाळीव प्राणी देखभाल केंद्रात ठेवलेल्या श्वानाला केंद्रातील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर श्वान मालकाने पेटा आणि प्राणीमित्र संघटनांच्या मदतीने पाठपुरावा केल्यानंतर या प्राणी देखभाल केंद्राकडे बोर्डींग संदर्भातील कोणताही परवाना आढळून आला नसल्याचे समोर आले. अखेर हे पाळीव प्राणी देखभाल केंद्र बंद करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाने काढले आहेत. मागील अनेक वर्षांपासून हे केंद्र विना परवाना सुरू असल्याचे या प्रकारानंतर समोर आले आहे.

श्वान प्रेमी अनेकदा कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्यास ते श्वानांना देखभाल केंद्रात ठेवत असतात. केंद्र चालकांकडून प्रत्येक दिवसाचे शुल्क श्वान पालकांकडून आकारले जातात. अशाचप्रकारे, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे राहणारे अभिषेक कुमार हे परदेशात जाणार होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे दोन श्वान २७ आणि २८ डिसेंबर या कालावधीत येऊर येथील डाॅग्ज अँड मी पेट रिसाॅर्ट अँड ट्रेनिंग स्कुल या देखभाल केंद्रात देखभालीसाठी ठेवले होते. या कालावधीत प्राण्यांची विचारपूस करण्यासाठी ते केंद्र चालकांना संपर्क करत. त्यामुळे केंद्र चालक त्यांना त्यांच्या श्वानांची चित्रफीत बनवून पाठवत होते. त्यावेळी चित्रफितीत एका श्वानाच्या डोळ्याला जखम झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ केंद्र चालकांना संपर्क करुन विचारले, श्वान खेळत असताना त्याला ही जखम झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा मालकाने त्याला रुग्णालयात घेऊण जाण्यास सांगितले.

श्वानाला रुग्णालयातून आणल्यानंतर केंद्र चालकांनी श्वानाची चित्रफीत मालकाला पाठवली असता, तेव्हा श्वानाच्या डाव्या डोळ्याला सुज असल्याचे आणि डोळा बाहेर आल्याचे दिसून आले. अभिषेक यांना प्रकरण गंभीर वाटल्याने त्यांनी केंद्र चालकांना श्वानास प्राण्यांच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास सांगितले. तेथील डॉक्टरांनी श्वानाचा डोळा तपासला असता, त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची शस्त्रक्रिया करुन डोळा काढावा लागेल, असे सांगितले. त्यानुसार, अभिषेक यांच्या सहमतीने या श्वानाचा डोळा शस्त्रक्रिया करुन काढण्यात आला. अभिषेक ३० डिसेंबरला भारतात परतले. त्यांनी केंद्रातील सीसीटीव्ही चित्रफीत तपासले असे असता, त्यांच्या श्वानाला तेथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचे दिसून आले. या मारहाणीत श्वानाच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली. याबाबत अभिषेक यांनी देखभाल केंद्राच्या चालकांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानंतर अभिषेक यांनी संबंधित देखभाल केंद्राविरोधात सरकारी यंत्रणांकडे पेटा संस्थेच्या माध्यमातून तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर एसपीसीए, पशु सवंर्धन विभाग आणि इतर सरकारी यंत्रणांनी तपासणी केली असता, संंबंधित केंद्राकडे बोर्डींग संदर्भातील कोणीतीही परवानगी आढळून आलेला नाही. याबाबत अभिषेक कुमार यांना विचारले असता, आम्ही अतिशय विश्वासाने संबंधित केंद्राकडे श्वानांना सोपविले होते. माझा एक श्वान एका डोळ्याने अंध झाला आहे. तर दुसऱ्या श्वानाला देखील भावनात्मक आघात झाला आहे. मला आणि माझ्या मुलांसाठी हा प्रकार अत्यंत भयावह असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित केंद्र परवान्याविना सुरू होते. अशी केंद्रे त्यांचा नफा कमविण्यासाठी अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना कामावर ठेवतात. प्राणी प्रेमींनी अशा कोणत्याही केंद्रात प्राण्यांना निवासासाठी ठेऊ नये. ॲड. मीत आशर, पेटाचे कायदेविषयक सल्लागार.

संबंधित देखभाल केंद्राकडे बोर्डिंग संदर्भाचा कोणतीही परवानगी नव्हती. त्यामुळे हे केंद्र बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहे. डाॅ. वल्लभ जोशी, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धनविभाग.

Story img Loader