ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत २६ जनावरांना लंपीची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये जनावरांचा बाजार बंद करण्यात आला असून जनावरांच्या शर्यती आणि प्रदर्शनही बंद करण्यात आले आहेत. अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

हेही वाचा >>>बदलापूर : पंधरवड्यातच महिनाभराचा पाऊस ; सप्टेंबरची सरासरी ओलांडली, सलग दुसऱ्या वर्षात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लंपी रोगाचे १२ केंद्र बिंदू असून एकूण २६ जनावरे बाधित आढळून आलेली आहेत. लंपी रोगाचे संक्रमण होऊ नये याकरिता जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये बाधित भागातील ५ किलोमीटर परिघातील परिसरात लसीकरण करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात पाच शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बाधित क्षेत्रातील ५ किलोमीटर परिघातील परिक्षेत्रात एकूण ७ हजार ७६ जनावरे आहेत. या क्षेत्रातील ७ हजार नऊ जनावरांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिसरात सर्व रोग नमुने, बाधित जनावरांना उपचार, रोग प्रतिबंधक लसीकरण याकरिता कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नसून सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत. याबाबत जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का ; ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

लंपी आजार जनावरांपासून माणसांना होत नाही. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने माणसांना कोणताही प्रकारचा संसर्ग होत नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडे आवश्यक औषधे आणि लस साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच लंपी सदृश्य लक्षणे असलेले जनावर निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा किंवा १९६२ मदत क्रमांकावर संपर्क करावा असेही पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.