ठाणे – मागील महिन्यापासूनच उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागला आहे. तर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्याच ठाणे जिल्ह्यात ४० पार तापमान गेले आहे. या सर्वाचा फटका नागरिकांप्रमाणेच पशुपक्ष्यांना होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला ठाण्यात ५ ते ७ श्वान आणि ४ ते ५ पक्षी निर्जलीकरणाचा त्रास होत असल्याचे कॅप संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारी मार्च महिन्यापासूनच तापमानात दिवसेंदिवस वाढ होण्यास सुरूवात झाली. कित्येकदा हे तापमान चाळीशी पार गेले. या वाढत्या उष्णतेपासून बचावाकरिता नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळले. महापालिका, आरोग्य विभागाच्या वतीने उष्मघाताचे प्रमाण रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली. सार्वजनिक ठिकाणी पाणपोई तयार करण्यात आल्या. विविध मार्गदर्शक तत्त्वे जाहिर केली. मात्र, नागरिकांसोबतच या उन्हाचा फटका पशु पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर बसत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे शहरात दिवसाला ५ ते ७ श्वान निर्जलीकरण, उष्मगाताचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. तर पक्ष्यांमध्ये दिवसाला ४ ते ५ पक्षी जखमी अवस्थेत आढळून येत आहेत. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली परिसरात मार्च महिन्यात चार घारींना उष्मघाताचा त्रास झाला. तर दोन कबुतरही प्राणी मित्रांना आढळून आले. तर, दोन श्वानही आढळल्याचे पॉज संस्थेचे संस्थापक डॉ निलेश भणगे यांनी सांगितले.

पक्ष्यांवर उपचार कसे होतात

तापमानात वाढ झाल्यास पक्ष्यांना निर्जलीकरणाचा त्रास होतो. ते जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले सापडतात. त्यांच्या शरीराचे तापमान वाढलेले असते. त्याचबरोबर त्यांना ताप असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परिस्थितीत पक्ष्यांना थंड कापडात ठेवण्यात येते. त्यांना पाणी पाजले जाते. आवश्यकता भासल्यास संस्थेचे प्राणीमित्र संस्थेत नेऊन त्यांच्यावर प्रथमोपचार करतात. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास या पक्ष्यांना तरीतरी आल्यावर सोडण्यात येते.

उष्मघातापासून बचावाकरिता कशा उपाययोजना कराल

घार, कबुतर हे पक्षी दुपारच्या वेळेत आकाशात उडत असतात. त्यामुळे त्यांना उन्हाचा थेट फटका बसतो. पक्ष्यांसाठी नागरिकांनी आपल्या घराच्या छतांवर किंवा सज्जामध्ये एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवावे. मात्र घार ही वस्ती असलेल्या ठिकाणी घार येत नाही. त्यामुळे इमारतीच्या गच्चीवर त्यांच्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी ठेवता येऊ शकते.

उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. साधारणत: मे महिन्यात अशा प्रकारचे तापमान असते. अनेकदा पशु पक्ष्यांना सावली मिळत नाही. जर एखादा श्वान अथवा प्राणी सावलीत बसले असल्यास त्यांना तेथून उठवू नये. तसेच आजु बाजुला प्राणी पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. तसेच एखादा प्राणी जखमी अवस्थेत आढळ्यास प्राणी मित्रांना संपर्क साधावा.- सुशांक तोमर, संस्थापक, सिटिझन फॉर ऍनिमल प्रोटेक्शन – कॅप