अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या पूर्व भागातील नागरी वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांवरची वाहतूक कोंडी कमी करणारा आणि शहराला नवी ओळख देणाऱ्या पहिल्या बाह्यवणळ रस्ता वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघाताचे केंद्र बनला आहे. रविवारी मध्यरात्री पुन्हा एक अपघात या बाह्यवळण रस्त्यावर झाला. यात एक महिला प्रवासी जखमी झाली असून चारचाकी आणि रिक्षा यांच्यात धडक झाली. त्यामुळे वाहनचालकांचा बेदरकारपणा जीवावर बेतत असल्याचे दिसते आहे.
अरूंद रस्ता, अंतर्गत वाहतुकीची भर यामुळे रेल्वे स्थानक ते आनंद नगर या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे हा भाग कायमच वाहनांनी व्यापलेला असायचाय 2019 नंतर लोकनगरी पुलापासून ते गोविंद पुलापर्यंत बाह्यवळण रस्ता उभारण्यासाठी रस्त्याचे आरेखन बदलण्यात आले. त्यानंतर येथे कॉंक्रिटचा रस्ता उभारण्यात आला. एमएमआरडीए आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या माध्यमातून विकसीत केलेल्या या रस्त्याला नवी झळाळी देण्यात आली. दुभाजकावर झाडे लावत, प्रकाश योजना आणि शेजारी छोटेखानी उद्यान उभारत रस्त्याला वेगळे रूप मिळाले. त्यामुळे शहर पर्यटनाचा भाग म्हणूनही या रस्त्याकडे पाहिले गेले. दररोज शेकडो नागरिक या रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी, निवांतपणे बसण्यासाठी येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावर वाढलेल्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होते आहे. रस्ता खड्डेमुक्त असल्याने येथून जाणाऱ्या वाहनचालकांकडून बेदरकारपणे वाहने चालवली जातात. या बेदरकारपणामुळे अनेकदा नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. कही महिन्यांपूर्वी येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता. रविवारी मध्यरात्री अशाच प्रकारे आणखी एक अपघात येथे झाला. चारचाकी वाहन आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. यातील चारचाकी दुभाजकावरही आदळली. यात एक महिला जखमी झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकीकडे खराब रस्त्यांमुळे अपघात होत असताना दुसरीकडे वाहनचालकांच्या बेजबाबदारपणामुळे चांगल्या रस्त्यांवर अपघात होत आहेत. त्यामुळे अशा वाहनचालकांना वेसन घालण्याची मागणी होते आहे.