ठाण्यात शुक्रवारी कुख्यात गुंड गणेश जाधव याच्या हत्येप्रकरणी नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. शशिकांत वटकर असे आरोपीचे नाव असून त्याला ठाण्यातील खारटन रोड येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत चार जणांना या प्रकरणात अटक झाली आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.
हेही वाचा- धक्कादायक ! पुण्यातील सदाशिव पेठेत आगीत होरपळून सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू
ठाण्यातील नौपाडा येथील घंटाळी मंदिर परिसरात शुक्रवारी गोळीबार झाला होता. त्यात एक तरुण जखमी झाला. त्यानंतर या हल्लेखोरांनी येऊर येथे जाऊन कुख्यात गुंड गणेश जाधव याच्या डोक्यात आणि मानेवर गोळी झाडून त्याची हत्या केली होती. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण ठाणे शहर हादरले होते. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू होता.
हेही वाचा- पुणे: फूटपाथवर वस्तू विक्री करणाऱ्या मुलांसोबत काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी साजरी केली दिवाळी
दरम्यान, याप्रकरणात शुक्रवारी गुन्हे अन्वेषण शाखा आणि नौपाडा पोलिसांनी गोळी झाडणारा विपीन मिश्रा याच्यासह त्याचे साथिदार सुरज मेहरा, सौरभ शिंदे यांना अटक केली होती. आरोपींनी घंटाळी रोड येथून ये-जा करण्यासाठी एका रिक्षाचा वापर केला होता. त्यामुळे या रिक्षाचालकाचा पोलिसांकडून सुरू होता. दरम्यान, यातील रिक्षा चालक हा खारटन रोड परिसरात राहत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शशिकांत वटकर याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यामुळे या गोळीबारात आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे.