नवीन कळवा पुलाचे लोकार्पण करत पोलीस आयुक्तालय कार्यालय ते कळवा चौक, बेलापूर रोडवरील मार्गिका काही दिवसांपूर्वीच खुली करण्यात आली असून त्यापाठोपाठ आता या पुलावरील ठाणे कारागृहाच्या बाजूकडील मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. तशी घोषणा करत या पुलाची ही चौथी मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असल्याचा दावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे.
हेही वाचा >>>घोडबंदर मार्गावर अवजड वाहतूक मध्यरात्री बंद; मेट्रोच्या कामामुळे वाहतूक बदल लागू
कळवा नवीन खाडी पुलाचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १३ नोव्हेंबर रोजी झाले. यांनतर पुलावरील पोलीस आयुक्तालय कार्यालय ते कळवा चौक, बेलापूर रोडवरील मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. या लोकापर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे कारागृहाजवळील मार्गिका १ डिसेंबर रोजी सुरू करण्याची घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणेच हि मार्गिका एक दिवस पूर्वीच म्हणजेच दिनांक ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आयुक्त बांगर यांनी केली आहे. या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत पूर्ण करण्यात आले आहे.
ठाणे कारागृहाच्या बाजूकडील ही मार्गिका कळवा चौक आणि बेलापूर मार्गावर उतरणार आहे. ही मार्गिका वाहनांसाठी सुरू झाल्यावर ठाणे बाजूकडील चौकामध्ये तसेच कळवा येथील शिवाजी चौक या दोन्ही ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटणार आहे, असा दावा आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला आहे.
हेही वाचा >>>भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी केला; जितेंद्र आव्हाड यांची पाटील यांच्यावर टिका
कळवा पुलावरील चौथ्या मार्गिकेचे काम हे वेळेत पूर्ण झाले असून ही मार्गिका आजपासून सुरू होत आहे. या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर सुटणार असून वेळेची बचत होणार आहे. ही मार्गिका वाहतुकीस खुली केल्यानंतर कळवा चौक परिसर, ठाण्याहून बेलापूर, नवीमुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. तसेच साकेतकडील मार्गिकेचे कामही युद्ध पातळीवर सुरू असून ही मार्गिका ३१ मार्च २०२३ रोजी सुरू करण्यात येणार आहे.-अभिजीत बांगर ,महापालिका आयुक्त, ठा.म.पा