जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांपाठोपाठ आता मिरा-भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ रुग्णांपैकी ४० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाणे तसेच कल्याण-डोंबिवली शहरांमधील रुग्ण संख्येत दुपटीने वाढ झाली असून त्याचबरोबर अंबरनाथमध्ये एका रुग्णाचा मृत्यु झाला आहे. यामुळे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे मृत्यु झालेल्यांची संख्या तीन इतकी झाली आहे. रुग्ण संख्येत होणारी वाढ तसेच मृत्युची वाढती संख्या यामुळे जिल्हा तसेच पालिका प्रशासनाची झोप उडाली आहेे.

ठाणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे चित्र असतानाच, जिल्ह्यात स्वाईन फ्लुने डोके वर काढल्याचे समोर आले होते. ठाणे आणि कल्याण-डोंबिवली शहरांपाठोपाठ आता मिरा-भाईंदर, नवी मुंबई, अंबरनाथ आणि ग्रामीण भागात स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात संपुर्ण जिल्ह्यात १ लाख १८ हजार ६७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात ६६ रुग्णांना स्वाईन फ्लुची लागण झालेली असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ४० रुग्ण सद्यस्थितीत उपचार घेत आहेत तर, उर्वरित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे. तीन रुग्णांचे आतापर्यंत मृत्यु झाले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रातील असून त्या खालोखाल कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात रुग्ण आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात स्वाईन फ्लुचे २० रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी दोन महिला रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

१५ जणांवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे तर, तीन जणांवर उपचार सुरु होते. गेल्या दोन दिवसांत शहरातील रुग्ण संख्येत दुपटीने वाढ होऊन रुग्ण संख्या ४० इतकी झाली आहे. ठाणे शहरात सध्या १८ सक्रीय रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली शहरात सात रुग्ण आढळले होते. त्याठिकाणी आता रुग्ण संख्या १८ इतकी झाली असून त्याठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या १५ इतकी आहे. मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात १, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ५, अंबरनाथमध्ये १ आणि ग्रामीण भागात १ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्येत होणारी वाढ तसेच मृत्युची वाढती संख्या यामुळे जिल्ह्याची आरोग्य चिंता वाढली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Story img Loader