अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर, महत्वाच्या चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दुकाने, टपऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याविरूद्ध नागरिकांत संताप वाढत असतानाच अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने शहरातील पश्चिम भागात असेलल्या जावसई परिसरातील महेंद्र नगर येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. यात २५ जोत्याची कामे, ५ गाळे आणि सात घरे जमिनदोस्त केली आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने पालिकेचे कौतुक होते आहे. मात्र शहरातील रस्ते आणि चौकांमध्ये उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवरही कारवाई करावी अशी मागणी होते आहे.

बदलापूर शहरात कुळगाव बदलापूर नगरपालिका एकीकडे अतिक्रमणांवर हातोडा चालवत असताना दुसरीकडे अंबरनाथ शहरात मात्र अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे वाढत असल्याचे चित्र आहे. अंबरनाथ शहराच्या जवळपास सर्वच चौकांमध्ये दुकाने आणि टपऱ्यांचा विळखा पाहायला मिळतो आहे. त्याचवेळी अंबरनाथ शहराचे प्रवेशद्वार असलेल्या आनंदनगर परिसरापासून लोकनगरी स्मशानभूमीपर्यंतच्या पट्ट्यात या अतिक्रमणांनी मोठे डोके वर काढले आहे.

यातील अनेक दुकाने कोणत्याही परवानगीशिवाय उभारण्यात आली आहेत. या दुकानांच्या बाहेरही दुकानाचे साहित्य पाहायला मिळते. या ठिकाणी ग्राहकही रस्त्यावरच वाहने लावून वस्तू खरेदी करताना दिसतात. परिणामी या भागात कोंडीही होते आहे. या अतिक्रमणांकडे पालिकेचा कानाडोळा होतो आहे. परिणामी पालिका प्रशासनाचा धाक यांना उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

त्याचवेळी बुधवारी अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने शहराच्या पश्चिम भागातील जावसई परिसरात असलेल्या महेंद्र नगर येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. येथे असलेले २५ जोत्याची बांधकामे, ५ गाळे ७ घरे यावेळी जमीनदोस्त करण्यात आली आहेत. या कारवाईने अनधिकृत बांधकाम धारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

इतर ठिकाणी कारवाई कधी सध्या अंबरनाथ शहरातील विविध चौक फेरिवाले, विक्रेत्यांनी गिळंकृत केले आहेत. फॉरेस्ट नाका, आनंदनगर चौक, लोकनगरी रस्ता, मटका चौक, विमको नाका, लादी नाका अशा विविध ठिकाणी फेरिवाल्यांची वाहने उभी असतात. त्यांच्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. काही चौकांमध्ये सिगारेट, प्रतिबंधित गुटखा विक्रीही राजरोसपणे केली जाते आहे. त्या सर्वांकडे दुर्लक्ष होते आहे.