ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘चुलीवरील जेवणा’च्या जाहिराती
पूर्वी स्वयंपाक करण्यासाठीचे महत्त्वाचे साधन असलेल्या चुली काळाच्या ओघात नामशेष झाल्या. त्यांची जागा आधी स्टोव्ह आणि त्यानंतर गॅस शेगडय़ांनी घेतली. मात्र घरातून हद्दपार झालेल्या या चुली हॉटेल आणि ढाब्यात पोहोचलेल्या आहे. चुलीवरील जेवण रुचकर आणि चटकदार लागत असल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक चुलीचा वापर करत आहेत. ‘आमच्याकडे चुलीवरील स्वादिष्ट जेवण मिळेल’ अशा जाहिराती करून अनेक हॉटेलचालक ग्राहकांना आकर्षित करत आहेत.
वसईतील ग्रामीण भागात काही वर्षांपूर्वी स्वयंपाकासाठी घरोघरी मातीच्या चुली दिसत होत्या. परंतु आता धुराची कटकट टाळून झटपट स्वयंपाक होण्यासाठी चुलीऐवजी गॅसच्या शेगडय़ा आल्या आहेत. त्यामुळे चुलीवरील रुचकर जेवण दुरापास्त झाले. थापीव भाकर वांग्याचे भरीत आणि अन्य भाजी त्याचबरोबर चुलीवर शिजवलेले चिकन, मटन आदी खमंग पदार्थाच खवय्ये मुकले. नेमकी हीच बाब हॉटेल व्यावसायिकांनी हेरली आणि त्यांनी चुलीवरील जेवणासंबंधी जाहिरात करण्यास सुरुवात केली आहे.
घरगुती चुलींची मागणी घटली
पूर्वी बहुतेक घरांमध्ये दोन चुली असायच्या.त्यासाठी कुंभार मंडळी मातीच्या चुली पुरविण्याचे काम करत असत. परंतु, मातीची चूल बनवण्यासाठी लागणारी चोपण माती, घोडय़ाची लीद यांसह राख मिळणे दुरापास्त झाल्याने चुली बनविणाऱ्यांची संख्या कमी झाली. दुसऱ्या बाजूला घरात चुलीसाठी लागणारे सरपण मिळेनासे झाले. त्यामुळे मागणी घटली.
वैष्णवी राऊत