कल्याण – पहलगाम येथील भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत कल्याणमधील नागरिक आणि सर्व राजकीय पक्षांतर्फे गुरुवारी दहशतवाद्यांचे समुळ उच्चाटन करावे, यासाठी ठोस आक्रमक पावले उचलण्यात यावीत, या मागणीसाठी राष्ट्रपती दौप्रदी म्रुर्मू यांना एक निवेदन देण्यात आले. हे निवेदन कल्याणचे तहसीलदार सचिन शेजळ यांनी नागरिकांच्या शिष्टमंडळाकडुन स्वीकारले.
तसेच, कल्याण पूर्व भागात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा भव्य मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. महिला, पुरूष, तरुण, तरुणी, सर्व पक्षीय कार्यकर्ते या निषेध मेणबत्ती मोर्चात सहभागी झाले होते.राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की देशातून दहशतवादाच समुळ उच्चाटण करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत. नागरिकांना भयमुक्त वातावरणात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही फिरता आले पाहिजे, असे वातावरण देशात निर्माण होणे आवश्यक आहे. देशाच्या सीमेवर कोठेही दहशतवादी दिसले तर त्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्यात याव्यात. पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना कठोर अद्दल घडविण्यात यावी, अशा मागण्या कल्याणकर नागरिकांच्या वतीने राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
हे निवेदन देण्यापूर्वी भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एक मेणबत्ती मोर्चा कल्याणमध्ये काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान दरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश माजी सचिव नोवेल साळवे, कल्याण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विजय पंडित, ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर, अजित पवार गटाच्या सत्यभामा जयस्वार, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष रोकडे, राजु पांडे, विशाल दामले, अशोक राजपुत, कुसुम गेडाम उपस्थित होते.
यावेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर नागरिकांनी दणाणुन सोडला होता. पाकिस्तान, दहशतवाद्यांविषयी नागरिक तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत होते.
कल्याण पूर्वेत मोर्चा
कल्याण पूर्व खेडगोळवली भागात गुरुवारी रात्री माजी नगरसेवक महेश गायकवाड, माजी नगरसेवक महादेव रायभोळे, माजी उपमहापौर उमेश म्हात्रे, मधुर म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख यांच्या उपस्थितीत भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानला भारताने चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली.
नोकरीची मागणी
डोंबिवलीतील अतुल मोने दहशतवादी हल्ल्यात मरण पावले. ते मध्य रेल्वेत वरिष्ठ विभाग अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यामुळे अतुल मोने यांच्या पत्नीला रेल्वे प्रशासनाने नोकरी द्यावी. तसेच मोने यांच्या कुटुंबातील मुलगी शिक्षण घेत आहे. तिच्या पुढील शिक्षणाचा विचार करून त्यांना योग्य ती आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन केली. या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आणि यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.