ठाणे, कळवा तसेच मुंब्रा परिसरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून ठाणे पोलिसांनी विशेष मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सविस्तर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर नुकत्यात ठाण्यात झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या एका कार्यक्रमात पोलिसांनी सुमारे दीड हजार अर्जाचे वाटप केले असून या अर्जाद्वारे ज्येष्ठ नागरिकांची सविस्तर माहिती जमा करण्यात येणार आहे.
वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिकांकडे फारशी प्रतिकारशक्ती नसते, तसेच वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहत असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या घरांवर चोरटय़ांची नजर असते. अनेक ज्येष्ठ नागरिकांची उपजीविका पेन्शनवर सुरू असते. यामुळे प्रत्येक महिन्याला पेन्शनची रक्कम घेण्यासाठी त्यांना बँकेत जावे लागते. ज्येष्ठ नागरिक बँकेतून पेन्शनची रक्कम घरी घेऊन जात असताना चोरटय़ांनी त्यांच्याकडील पैसे लुटले किंवा भामटय़ाने भूलथापा देऊन पैसे लंपास केले, असे प्रकार यापूर्वीच्या अनेक घटनांमधून उघड झाले आहेत. तसेच काही ज्येष्ठ नागरिकांकडे अफाट संपत्ती असते आणि त्यांची मुले परदेशात राहत असतात. यामुळे या ज्येष्ठ नागरिकांना इथे एकटेच राहावे लागते. काही वेळेस ज्येष्ठ नागरिकांची हत्या झाल्याच्या घटनाही पुढे आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागांतील ज्येष्ठ नागरिकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader