गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ठाणे पोलीस दलातील उपायुक्तपदाच्या अंतर्गत बदल्या आणि नियुक्त्या अखेर करण्यात आल्या आहे. नवी मुंबई येथील परिमंडळ दोन- पनवेल हा प्रभावी विभाग पाहणारे शिवराज पाटील यांची ठाणे पोलीस दलात बदली झाली. त्यानंतर त्यांची पुन्हा एकदा महत्त्वाच्या म्हणजेच, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, मागील चार ते पाच महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्तपदी डाॅ. विनयकुमार राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा- दिलासा! ‘हर हर महादेव’ राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर
ठाणे पोलीस दल हे मुंबईनंतरचे महत्त्वाचे पोलीस दल मानले जाते. त्यामुळे या पोलीस दलात नियुक्ती आणि बदलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू असते. गेल्याकाही महिन्यांपासून या बदल्या रखडल्या होत्या. त्यानंतर गृह विभागाने नुकत्याच या बदल्यांना मंजूरी दिली. त्यानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांची नागपूरला बदली झाली आहे. तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त सुनील लोखंडे यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आणि ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्तपद हे सुमारे पाच महिन्यांपासून रिक्त आहे. याठिकाणी प्रभारी म्हणून उपायुक्त कांबळे हे कामकाज पाहत होते. त्यामुळे या प्रभावी पदांचा पदभार कोणाला मिळेल, याची चर्चा संपूर्ण पोलीस दलात होती.
बदल्या आणि नियुक्त्यामध्ये ठाणे पोलीस दलात सात नव्या उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामध्ये उपायुक्त श्रीकांत परोपकारी, राजेंद्रकुमार दाभाडे, अमरसिंग जाधव, एस. एस. बुरसे, रुपाली अंबुरे, शिवराज पाटील आणि नवनाथ ढवळे यांचा सामावेश आहे. हे अधिकारी हजर झाल्याने शनिवारी त्यांंना पदभार देण्यात आला आहे. शिवराज पाटील यांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपायुक्त पदी नियुक्ती मिळाली. शिवराज पाटील यांनी यापूर्वी नवी मुंबई पोलीस दलातील परिमंडळ दोन -पनवेल हा प्रभावी विभाग मिळाला होता. आताही त्यांची ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा या महत्त्वाच्या पदी नियुक्ती झाली आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पदी राजेंद्रकुमार दाभाडे आणि परिमंडळ पाचचे उपायुक्त डाॅ. विनयकुमार राठोड यांची ठाणे वाहतूक शाखेच्या पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा- मीरा भाईंदर नाट्यगृहातील पहिला प्रयोग रद्द; नाट्यगृहात त्रुटी असल्याचा निर्मात्यांचा आरोप
उपायुक्त नावे – नेमणुकीचे ठिकाण
१) श्रीकांत परोपकारी- विशेष शाखा
२) राजेंद्रकुमार दाभाडे- आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा
३) अमरसिंग जाधव- परिमंडळ पाच- वागळे इस्टेट
४) एस. एस. बुरसे – मुख्यालय -दोन
५) रुपाली अंबुरे – मुख्यालय -एक
६) शिवराज पाटील- ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा
७) नवनाथ ढवळे- परिमंडळ दोन- भिवंडी
८) डाॅ. विनयकुमार राठोड- वाहतूक नियंत्रण शाखा
९) डाॅ. सुधाकर पठारे- परिमंडळ चार- उल्हासनगर
१०) गणेश गावडे – परिमंडळ एक- ठाणे.