कल्याण – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील शहरे, गावांची भविष्यकालीन पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिलार नदीवरील शिलार धरण प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. चार हजार ८६९ कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. पोशीर नंतर शिलार धरण प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिल्याने येत्या काळातील एमएमआर क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पोशीर, शिलार या धरण प्रकल्पांचे प्रस्ताव मागील २० वर्षापूर्वीच तयार करण्यात आले होते. परंतु, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, बदलणारी सरकारे, निधीची उपलब्धता अशा अनेक कारणांमुळे हे महत्वाचे धरण प्रकल्प रखडत होते. एमएमआर क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे नागरीकरण पाहून शासनाने या भागातील धरण प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. शिलार धरण प्रकल्प खर्चाचा प्रस्ताव कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या ठाणे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद मुंजाप्पा यांनी जलसंपदा विभागाला दोन महिन्यापूर्वी पाठवला होता.

या प्रकल्पाची पुणे येथील राज्यस्तरिय तांत्रिक सल्लागार समितीने छाननी केली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमाक प्राधिकरणाने या प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली आहे. पोशीर धरण प्रकल्पाप्रमाणे शिलार धरण प्रकल्पाला नगरविकास विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी चर्चा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाली आहे. शिलार धरण प्रकल्पाचे संंकल्पचित्र नाशिक येथील मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेच्या माध्यमातून तयार करून घेण्यात आले आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या खर्चासाठी चार हजार ६५४ कोटी, इतर अनुषंगिक खर्चासाठी दोन हजार १४८ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत, असे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या प्रस्तावात म्हटले आहे.

प्रकल्पाची तांत्रिक माहिती

शिलार धरण प्रकल्प उल्हास खोऱ्यात येतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शिलार नदीवर १८९ दशलक्ष घनमीटर पाणी साठवणीचा हा धरण प्रकल्प आहे. या धरणाची पाणी पुरवठ्याची क्षमता वार्षिक १८१ दशलक्ष घनमीटर (८३२ दशलक्ष लीटर) आहे. नाशिक येथील जलविज्ञान व धरण सुरक्षितता विभागाने शिलार धरणास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र दिले आहे. धरणाची लांबी तीन हजार १० मीटर, उंची ४६ मीटर आहे. शिलार धरणासाठी एकूण सुमारे १५०० हेक्टर जमीन आवश्यक आहे. यामध्ये ३४५ हेक्टर जमीन वन विभाग, एक हजार ११५ हेक्टर जमीन खासगी आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र ९४ चौरस किलोमीटर आहे. या धरणातून पिण्यासाठी १३५ दशलक्ष घनमीटर (५०३ दशलक्ष लीटर), औद्योगिक वापरासाठी ४५ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे. या धरणाला १०८ मीटरचा सांडवा आहे. धरणातील पाणी प्रमाणित करण्यासाठी एकूण सात वक्राकार दरवाजे प्रस्तावित आहेत.

पोशीर, शिलार धरण प्रकल्पांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील शहरे, गावांचा भविष्यकालीन पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा केला होता. या प्रकल्पांना शासनाने मंजुरी दिली आहे. यापुर्वीच या प्रकल्पांची उभारणी होणे आवश्यक होते.- राम पातकर ,स्थापत्य तांत्रिक सल्लागार, बदलापूर.