लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : बहुचर्चित ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पूनर्निर्माण आराखड्यास आणि अंदाजपत्रकास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ५६० कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक असून सार्वजिनक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथे ३ हजार २७८ खाटांची व्यवस्था होणार आहे. तसेच मनोरुग्णाचे नातेवाईकांना वसतिगृह, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासी व्यवस्था अशा विविध २८ ते ३० इमारती बांधल्या जाणार आहेत. सध्या या रुग्णालयाचे बांधकाम जीर्ण झाले आहे. सुमारे १२५ वर्षे जुने रुग्णालय असून सध्या या रुग्णालया १ हजार ८५० खाटांची व्यवस्था आहे.

ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय १९०१ मध्ये हे रुग्णालय सुरू झाले होते. मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात. तसेच परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा इतर मार्गाने वाट चूकून येतात. हे रुग्ण रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणले जाते. त्यामुळे राज्यातील इतर तीन प्रादेशिक मनोरुग्णालयापेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रमाणही खूप असते. सुमारे ५० एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयाच्या काही भागात अतिक्रमण झाले आहे. रुग्णालयाच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या रुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. तसेच २८ ते ३० एकर जागेत मनोरुग्णालयाचे पूनर्निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

आणखी वाचा-डोंबिवलीत रस्त्यावर सापडलेल्या मतदार ओळखपत्रप्रकरणी ‘बीएलओ’ अधिकाऱ्यांवर गुन्हा

नुकताच राज्य शासनाने रुग्णालयाच्या आराखड्यास आणि ५६० कोटी पाच लाख ४९ हजार रुपये इतक्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे येथे ३ हजार २७८ खाटांची व्यवस्था होणार आहे.

कसे असेल रुग्णालय

मुख्य दुमजली इमारत असून यात ३ हजार ४०० चौ.मीटर इतके बाह्य रुग्ण कक्ष असेल. तसेच महिला आणि पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळे सामान्य कक्ष, निरीक्षण कक्ष, रुग्णांच्या नातेवाईकांना तीन मजली वसतिगृह, तृतिय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत, वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान अशा विविध सुविधा इमारती रुग्णालयाच्या आवारात असतील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Approval of the plan of thane regional psychiatric hospital mrj
Show comments