ठाणे स्थानकांपासून लांब अंतरावरून परत येण्याचे भाडे मिळत नसल्याने आणि कमी अंतरासाठी अधिकचे इंधन आणि वेळ खर्ची पडत असल्याने रिक्षाचालक थेट नकार देत असल्याने ठाणेकरांच्या नाकीनऊ आले आहेत.

स्थानक आणि विविध भागांतील नाके पटकावलेल्या काही रिक्षाचालकांनी गेले काही दिवस मुसळधार पावसात प्रवाशांची परीक्षा घेण्यास सुरुवात केल्याचा अनुभव काही प्रवाशांनी ‘लोकसत्ता’कडे कथन केला. पावसात प्रवाशांची खूपच अडचण होते. त्यातून सुटका मिळविण्यासाठी प्रवाशांचा तातडीने रिक्षा मिळविण्याचा प्रयत्न असतो. मात्र, कधीकधी अर्धा ते पाऊण तास प्रतीक्षा करूनही रिक्षा मिळत नाही, असे काही नोकरदार प्रवाशांनी सांगितले.

हे ही वाचा… ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाची पुन्हा चर्चा, ठाणे पदाधिकाऱ्यांची आज मुंबईत बैठक

रिक्षाचालक अधिक अंतरावरचे भाडे शक्यतो नाकारत नाहीत. परंतु, अलीकडे रिक्षाचालक त्यासाठीही नकार देत असल्याने अडचण झाली आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली. रिक्षाचालकांची मनमानी दिवसेंदिवस वाढत आहे. ‘शेअर रिक्षा’साठी तीन प्रवाशांची मर्यादा आहे. तरीही चालक चार ते पाच प्रवाशांना कोंबत असल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली. या साऱ्या प्रकाराकडे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याकडे काही प्रवाशांनी लक्ष वेधले.

ठाणे शहराच्या विविध भागांत रिक्षा थांबे उभारण्यात आलेले आहेत. शहरातील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या स्थानक परिसरातही रिक्षा थांबे उभारण्यात आलेले आहेत. मात्र, या थांब्यांवर रिक्षा उपलब्ध होत नाहीत.

रिक्षाचालकांना मनाजोगे भाडे मिळाले तरच ते प्रवाशांची वाहतूक करतात. अन्यथा, सीएनजी नसल्याचे तसेच इतर कारणे सांगून भाडे नाकारतात. काही रिक्षाचालकांना भाडे नाकारल्याचा जाब विचारल्यास ते प्रवाशांसोबत हुज्जत घालतात. यानंतर ते थांब्यावरून रिकामी रिक्षा घेऊन निघून जातात पण, प्रवाशांची वाहतूक करत नाहीत. ठाणे स्थानकातील सॅटीस पुलाखाली रिक्षांचा थांबा आहे. याठिकाणी नागरिकांना रिक्षा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी स्थानकात येणारी रिक्षा थांब्यांवरच येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही अनेक रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र उभे राहतात. याठिकाणी वाहतूक पोलिसही तैनात असतात. एखाद्या प्रवाशाने तक्रार केल्यावर ते संबंधित रिक्षाचालकांवर दंड आकारण्याची कारवाई करतात. यानंतरही रिक्षाचालकांचे भाडे नाकारण्याचे प्रकार थांबत नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

घोडबंदर, वागळे इस्टेट, ठाणे शहर, ढोकाळी, बाळकुम, कोलशेत, कापुरबावडी, माजिवाडा, मनोरमानगर या भागात रिक्षाचालक भाडे नाकारत आहेत. यामुळे प्रवाशांना भरपावसात रिक्षा प्रतिक्षेत बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.

हे ही वाचा… आमदार जितेंद्र आव्हाडांसह २२ जणांवर गुन्हे दाखल; खोट्या गुन्ह्यात अडकविल्याचा तक्रारदारीत आरोप

प्रवासी सुरक्षा वाऱ्यावर

ठाणे स्थानक परिसरातून अनेक शेअर रिक्षांची वाहतूक सुरू असते. या रिक्षांमधून तीन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना चार ते पाच प्रवासी वाहतूक केली जाते. याआधी अशा वाहतुकीदरम्यान अपघातात प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. शहरात अशी बेकायदा धोकादायक वाहतूक सुरू असताना केवळ दंडात्मक कारवाई करून सोडून दिले जाते. त्यामुळे रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे. अरुंद रस्त्यांवर रिक्षाचालकांना कमाल वेगमर्यादा घालून दिली पाहिजे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

शहरात काही रिक्षा चालकांकडून सुरु असलेल्या बेशिस्तपणाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाल आणि वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली आहे. भाडे नाकारण्यावरुनच नाही तर, विविध कारणांमुळे रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा उघड होत असतो. वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. – विनायक सुर्वे, अध्यक्ष, एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना

रिक्षा भाडे नाकारणे वा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येते. समाजमाध्यमांवरील तक्रारींच्या आधारेही कारवाई होत आहे.- डॉ. विनयकुमार राठोड, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे