कल्याण: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यासाठी आक्रमक पुढाकार घेणारे ज्येष्ठ वास्तुविशारद संदीप पाटील यांना भूमाफियांकडून धमक्या देण्यात येत आहेत. मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन भूमाफियांनी पाटील यांच्या घर परिसरात जाऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला. या सर्व प्रकरणाची तक्रार वास्तुविशारद पाटील यांनी राज्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव, पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
आपल्या जीवाला काही झाल्यास त्याची जबाबदारी शासनाची असेल, असे पाटील यांनी गृह विभागाच्या प्रधान सचिवांना कळविले आहे. चार दिवसापूर्वी डोंबिवलीत बेकायदा बांधकामाशी संबंधित विषयावरून एका इसमावर हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असताना आता ६५ बेकायदा बांधकामे, नियमबाह्य दस्त नोंदणीकरणाच्या विरूध्द आक्रमक भूमिका घेणाऱ्या वास्तुविशारद संदीप पाटील यांना माफियांकडून लक्ष्य करण्यात येत असल्याने शहरातील प्रतिष्ठांकडून, विकासक, वास्तुविशारद संस्थांकडून याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा… डोंबिवलीत सराफाचे दुकान फोडून ७५ लाखाच्या ऐवजाची चोरी
गेल्या वर्षापासून पाटील हे ठाणे पोलीस आयुक्तांकडे पोलीस संरक्षण, स्वसंरक्षणासाठी परवानाधारी बंदुकसाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांच्या दोन्ही मागण्या यापूर्वीच फेटाळण्यात आल्या आहेत. हा विषयही पाटील यांनी गृह विभागाच्या निदर्शनास आणला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पाटील यांना संरक्षण देण्याचे, त्यांच्या घर परिसरात गस्त घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अधिक माहितीसाठी होनमाने यांना संपर्क साधला. त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.