लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बेलापूर, ऐरोली आणि कल्याण विधानसभा मतदारसंघात उघड बंडखोरी झाली. तर अंबरनाथ, मुरबाड विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरूद्ध शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांना विरोधात भूमिका घेतली होती. या सर्व बंडखोर आणि नाराजांनी आता पुन्हा शिवसेनेची वाट धरली आहे. अनेकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद सुरू केला असून लवकरच अशांची घरवापसीची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे ते परंपरागत विरोधी पक्ष पहिल्यांदाच रिंगणात दिसले. शिवसेना भाजप महायुतीत अजीत पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही सहभागी झाला होता. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीवरून वाद होते. सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण झाली होती. जिल्ह्यात भाजपच्या बंडखोरांना शांत करण्यात भाजपला यश आले होते. मात्र शिवसेनेत शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोर शांत झाले नव्हते. त्यामुळे कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्याविरूद्ध शिवसेनेचे महेश गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरला. बेलापूर मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरूद्ध शिवसेनेच्या विजय नाहटा यांनी बंडखोरी केली होती. तर ऐरोली मतदारसंघात विजय चौगुले यांनी बंडखोरी केली होती. सोबतच अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एका गटाने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरूद्ध प्रचार केला. शेजारच्या मुरबाडच्या मतदारसंघात शिवसेनेच्या शहरप्रमुखानेच भाजपच्या किसन कथोरे यांच्याविरूद्ध आघाडी उघडली होती. त्यामुळे येथेही महायुतीत काही काळ बेबनाव झाला होता.

आणखी वाचा-ठाण्यात वृक्षांची कत्तल, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

मात्र आता विधानसभा निवडणुकांनंतर या सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीला अपेक्षित निकाल लागला आहे. त्यामुळे त्या त्या काळच्या बंडखोर आणि नाराजांनी पुन्हा शिवसेनेशी जुळवून घेण्यास सुरूवात केली आहे. हे सर्व बंडखोर पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. या सर्वांनी समाजमाध्यमे आणि जाहीर फलकांतून एकनाथ शिंदे, शिवसेना पक्षाच्या छबी प्रदर्शित करण्यास सुरूवात केली आहे. तर नाराजांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नवनियुक्त मंत्र्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा भेटी देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या सर्वांची घरवापसी निश्चित मानली जाते आहे. येत्या काळात पालिका निवडणुकांसाठी तयार करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचे कळते आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरची जुळवाजुळव केली जात असल्याचे बोलले जाते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are rebels in legislative assembly getting back to shiv sena shinde group again mrj