डोंबिवली– कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते कामांसह इतर कामांचा रतीब पाडणारे आणि इन्फ्रामॅन म्हणून स्वताची ओळख निर्माण करणाऱ्या खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील २० वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात लक्ष घालावे. कोकणात गणेशोत्सव काळात वर्षानुवर्ष जाणाऱ्या गणेशभक्तांच्या मार्गातील खड्ड्यांचे विघ्न कायमचे दूर करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह कोकणातीह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डिवचण्यासाठी सुपीक मेंदूतून ही संकल्पना पुढे आल्याचा अंदाज वर्तवून भाजपने त्यास तात्काळ तोडीस तोड उत्तर देऊन शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत खा. डाॅ. शिंदे यांचा विजयाचा कार्यभाग उरकल्यानंतर भाजपला खिंडीत गाठण्याचे उद्योग करू नयेत, असा इशारा दिला आहे.

या समाज माध्यमी शितयुध्दामुळे मागील पाच महिन्यापासून थंडावलेला चव्हाण-खा. शिंदे यांच्यातील सुप्त वाद पुन्हा उफाळून आला आहे. मागील तीन वर्षापूर्वी अशाच पध्दतीने चव्हाण यांना खा. शिंदे यांनी लक्ष्य केले होते.

भाजपचे प्रदेश नेते शशिकांत कांबळे यांनी शिवसेनेचे राजेश कदम यांना समाज माध्यमातून उत्तर दिले आहे. पक्षीय विचारधारा नसलेल्या, वैयक्तिक स्वार्थासाठी मनसे, शिवसेना अशा बेडूक उड्या मारणाऱ्या नेत्यांना, पक्षीय विचारधारेला लाथ मारणाऱ्या शिवसेनेच्या राजेश कदम यांनी आम्हाला नथीतून तीर मारण्याचा उद्योग करू नये. लोकसभा निवडणूक आली की नांगी आणि माना टाकून बसता. श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी भाजपच्या जीवावर लोकांकडे मत मागता. एकदा निवडून गेला की पुन्हा भाजपला खिजवण्याचा उद्योगधंदा सुरू करता. हे काही वर्ष सुरू असलेले बालिश उद्योग शिवसेनेने बंद करावे, असे आवाहन भाजपचे कांबळे यांनी केले आहे.

हेही वाचा >>>बदलापूर: बारवी धरण ८९ टक्क्यांवर, शनिवारच्या मुसळधार पावसाने सात टक्क्यांची भर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण काय काम करतात हे जनतेला माहती आहे. संबंध नसताना अनेक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी दोन वर्षापासून मंत्री चव्हाण प्रयत्न करत आहेत. या कामासाठी सहकार्य करण्याऐवजी शिवसेनेने या कामात विघ्न आणण्याचा उद्योग करू नये, असा खणखणीत इशारा कांबळे यांनी राजेश कदम यांना दिला आहे.

कल्याण डोंबिवलीसह, अंबरनाथ परिसरात खासदार डाॅ. शिंदे विकासाची अनेक कामे केली. विकासपुरूष म्हणून खा. शिंदे यांनी स्वताची ओळख निर्माण केली आहे. कामाचा दांडगा अनुभव असलेल्या खा. शिंदे यांनी आता रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गात लक्ष घालून हा रस्ते प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राजेश कदम यांच्यासह विश्वनाथ राणे, रमाकांत देवेळेकर, दीपक भोसले, सुभाष साळुंखे, दिनेश शिवलकर, संतोष तळाशीलकर, राजेश मुणगेकर, अनीश निकम, महेद कदम यांनी केली आहे.

गणेशोत्सव आला की फक्त हे काम पूर्ण करण्यासाठी काही बेडके डराव डराव करतात आणि कोकणवासियांना गाजरे दाखवितात. नंतर ते गायब होतात, असा खोचक चिमटा शिवसेनेने मंत्री चव्हाण यांना घेतला आहे. या टोल्यावरून भाजपमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शब्द दिला की तो पाळणे हा खासदार शिंदे यांचा धर्म आहे. त्यामुळे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग शासनाने त्यांच्याकडे सुूपर्द करावा. हे काम झटक्यात मार्गी लागेल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.शिवसेना-भाजपच्या अनेक वर्षाच्या मैत्रित स्वार्थांध राजेश कदम यांनी विष कालवण्याचा प्रयत्न करू नये, अशा इशारा भाजपने कदम यांना दिला आहे.

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्याची चौफेर कोंडी; वसई फाट्यावर ट्रक उलटल्याने १५ तास वाहतूक ठप्प

कोकणातील स्थानिक राजकारणी आणि ठेकेदार यांच्या वादामुळे गोवा महामार्ग रखडला आहे. ठेकेदारांची अनेक वर्षाची ६५० कोटीची देणी शासनाने अद्याप दिली नाहीत. या कारणांमुळे या महामार्गाचे कवित्व कायम असल्याचे समजते.

भाजप महायुतीचा धर्म पाळतो. लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या विजयासाठी भाजप कार्यकर्त्यांनी समर्पित भावाने काम केले. आता विजयानंतर अशा कुरघोड्या करण्याची गरजच नाही. शिवसेनेने युतीधर्म पाळावा एवढीच अपेक्षा. अन्यथा जशास तसे उत्तर आम्हीही देऊ.– शशिकांत कांबळे, भाजप प्रदेश नेते.

कोकणातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मुंबई-गोवा रखडलेला महामार्ग भविष्यवेधी विचार असणाऱ्या खा. श्रीकांत शिंदे यांनी पूर्ण करावा म्हणून मागणी केली आहे. यामध्ये भाजपने दुखावण्याचे कारण नाही. आपला तर यात काही स्वार्थ नाही. तरी भाजपने आपणास लक्ष केले याचे आश्चर्य वाटते.- राजेश कदम, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना.

(रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग.)