खारघर येथे महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोह‌ळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत १३ नव्हेतर ५० जणांचा मृत्यु आणि पाचशेहून अधिकजण जखमी झालेले आहेत, असा दावा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. या सोहळ्याचे कंत्राट दिलेल्या कंपनीत शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के हे भागीदार असल्याचे सांगत सोहळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्घटनाप्रकरणाची न्यायलयीन चौकशी करण्याबरोरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, नरेश म्हस्के यांनी मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्याध्यक्ष आरीफ नसीम खान यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. देशाचा पुरस्कार असेल तर, राष्ट्रपती भवनमध्ये आणि राज्याचा पुरस्कार असेल तर, राज्यपाल भवनमध्ये कार्यक्रम होतो. परंतु राज्य सरकारने मोकळ्या मैदानात महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोह‌ळ्याचा कार्यक्रम घेतला. करोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र शासनाकडून काही मार्गदर्शक सुचना आल्या होत्या. त्यानुसार ठाणे, नवीमुंबईसह इतर ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन राज्य सरकारने हा कार्यक्रम घेऊन केले. स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी सरकारने अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या अनुयायांना भर उन्हात उभे केले, असा आरोप खान यांनी केला.

हेही वाचा >>>ठाण्यातील बेकायदा भाजी बाजारासह फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई; जप्त केलेले फळ, भाजीपाल्याचे सेवाभावी संस्थांना वाटप

या सोहळ्यासाठी राज्य सरकारने १४ कोटींचे कंत्राट काढले होते. कन्सेप्ट कंपनीला हे कंत्राट देण्यात आले असून या कंपनीने लाईट ॲण्ड शेड कंपनीला सब कंत्राट दिले. शिवसेनेचे प्रवक्ते आणि माजी महापौर नरेश म्हस्के हे या कंपनीचे भागीदार आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. तिथे आलेल्या नागरिकांसाठी पालिकेने व्यवस्था केली नव्हती. ज्या कंपनीला हे काम दिले होते. त्यांनी निष्काळजीपणा केला. त्यामु‌ळे याप्रकरणाची न्यायलयीन चौकशी करण्याबरोरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या घटनेतील मृतांना प्रत्येकी २५ लाख, तसेच त्यांच्या कुटुबियातील एका सदस्याला सरकारी नोकरी द्यावी आणि उपचारार्थ दाखल असलेल्या लोकांना १० लाखांची मदत देण्याची मागणही त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे आहेत. परंतु या घटनेत जे मृत झालेले आहेत, त्यांचे साधे सात्वन करायला ते गेलेले नाहीत, अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

अन्यथा माफी मागा – नरेश म्हस्के

लाईट ॲण्ड शेड कंपनीशी माझा काहीही संबंध नाही. तरीही मी कंपनीचा भागीदार असल्याचे विधान सुषमा अंधारे यांनीही केले होते. २४ तासाची मुदत देऊनही त्यांनी याबाबत उत्तर दिलेले नाही. त्याचप्रमाणे नसीन खान यांनाही चार दिवस देतो. त्यांनी कंपनीशी संबंधित असल्याचे दाखवून द्यावे अन्यथा चार दिवसानंतर त्यांनी माझी माफी मागितली असे समजेन. लाईट ॲण्ड शेड ही कंपनी राष्ट्रवादी तसेच इतर पक्षांच्या कार्यक्रमाची कामे करते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याही कार्यक्रमाचे काम हीच कंपनी करते. माझी कंपनी असती तर आव्हाडांनी मला काम दिले असते का ?
नरेश म्हस्के ,शिवसेना प्रवक्ते

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arif naseem khan claims that 50 people died and 500 were injured in the kharghar accident amy