लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शुक्रवारी दुपारी दुचाकीवरुन आपल्या पती सोबत चाललेल्या एका महिलेवर १५ जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांनी हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. या महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेले तीन पादचारी टोळक्याच्या हल्ल्यात जखमी झाले. जखमींवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी टोळ्या रस्त्यावर उतरुन दहशत पसरविण्याचे प्रकार करत आहेत. लुटमार, घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत. महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटण्याच्या घटनांनी कहर केला आहे. या सगळ्या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. डोंबिवली, कल्याण शहरात कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकार शिल्लक आहे की नाही, असे प्रश्न नागरिक उव्दिग्नपणे करत आहेत.
आणखा वाचा-ठाणे: मेट्रोची कामे आणि वाहन बंद पडल्याने घोडबंदर ठप्प
पोलिसांनी सांगितले, कल्याण पूर्व भागात राहणारा तौशिब सय्यद आपल्या दुचाकीवरुन पत्नीसह चक्की नाका भागातून चालला होता. यावेळी १५ जणांच्या टोळक्याने तौशिबची दुचाकी अडवून त्याच्या पत्नीला शिवीगाळ करुन तिला मारहाण सुरू केली. याचवेळी टोळक्यातील काही जणांनी धारदार शस्त्रांनी महिलेवर हल्ला करुन तिला गंभीर जखमी केले. पती तौशिबला टोळक्याने मारहाण केली. महिलेवर हल्ला होत आहे पाहून काही पादचारी तिच्या बचावासाठी पुढे आले तर टोळक्याने त्यांनाही गंभीर जखमी केले.
जखमींच्या डोक्यावर, हातावर धारदार शस्त्राचे वार करण्यात आले होते. महिलेला जखमी केल्यानंतर टोळके घटनास्थळावरुन पसार झाले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तौशिब सय्यद याच्या पत्नीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १५ जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.